BMC : माटुंगा गांधी मार्केट परिसरात मिनी पंपिंग स्टेशननंतरही तुंबते पाणी; आता आणखी एक पंप बसवणार

164

माटुंगा-शीव येथील गांधी मार्केट परिसरात पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी लघु उदंचन केंद्र अर्थात मिनी पंपिंग स्टेशन बनवण्यात आले असले तरी येथील पंपानंतरही या ठिकाणी एक फुटाएवढे पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. त्यामुळे याठिकाणी अतिरिक्त पंप बसवण्यात येणार आहे. पंपिंग स्टेशनमध्ये हा पंप बसवण्यासाठी भाडेतत्वावर घेतला जाणार असून आता यासाठीही कोट्यवधी रुपये मोजले जाणार आहे.

माटुंगा-शीव येथील गांधी मार्केट परिसरात सातत्याने कमी पावसातही पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने या भागात पाणी तुंबले जात होते. त्यामुळे स्थानिक भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठवत येथील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणल्यानंतर वांद्रे कला नगर येथील पावसाच्या तुंबणाऱ्या पावसाचा जलदगतीने निचरा करण्यासाठी ज्याप्रमाणे मिनी पंपिग स्टेशन बनवण्यात आले आहे, त्याच धर्तीवर गांधी मार्केटच्या ठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार पर्जन्य जलवाहिनी विभाग व एफ उत्तर विभागाने याठिकाणी असलेल्या ३४०० अश्वशक्ती पंपांच्या तुलनेत येथे  १२००० अश्वशक्तींचे पंप बसवून मिनी पंपिंग स्टेशन तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याचे काम  २०२१मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर येथील रहिवाशांना आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मागील वर्षी या पंपिंग स्टेशननंतरही पाण्याचा निचरा जलदगतीने न झाल्याने याठिकाणी  रस्त्यावर एक फुटापर्यंतचे पाणी तुंबले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सन २०२२च्या पावसाळ्यामध्ये पंपिंग स्टेशनची व्यवस्था करूनही गांधी मार्केट येथील रस्त्यावर एक फुटापर्यंत पाणी साचले होते व त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अधिकचा वेळ लागला होता. त्यामुळे याठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गांधी मार्केटच्या पंपिंगच्या ठिकाणी पाहणी दौरा केला. त्यामध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी एक अतिरिक्त पंप पुरवण्याची व्यवस्था करावी अशी सूचना केली होती. त्यानुसार  ३००० घन मीटर प्रति तास क्षमतेचा एक अतिरिक्त पंप बसवण्यात येणार असून साज एंटरप्रायझेएस या कंपनीकडून हा पंप  एक वर्षांच्या कालावधीकरता भाडेतत्वावर घेतला जाणार आहे. त्यामुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पावसाळ्यात पाणी साचून राहण्याची शक्यता कमी असून एकप्रकारे येथील दुकानदारांसह रहिवाशांनाही दिलासा मिळेल,असा विश्वास पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा Wari Jihad : वारी जिहाद : वारकऱ्यांच्या तोंडून वदवले ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’, पंढरीच्या वारीत धर्मांतराचा प्रयत्न?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.