केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसतानाही एका संस्थेने ‘एशियन गेम्स’साठी निवड चाचणी घेत खेळाडूंच्या भविष्याशी ‘खेळ’ सुरू केला आहे. ‘इंडिया तायक्वांदो’ असे या संस्थेचे नाव असून, त्यांनी निवडलेला एकही खेळाडू ‘एशियन गेम्स’स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही.
चीनच्या हांगझू शहरात २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘एशियन गेम्स’ स्पर्धा होणार आहेत. त्यात तायक्वांदो या खेळासाठी ‘तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया’ ही संघटना भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यासाठी खेळाडूंची निवड करण्याकरिता ‘तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया’ने गुजरातमध्ये निवड चाचणी आयोजित केली आहे. रविवारी, १८ जूनपर्यंत ही निवड चाचणी सुरू राहणार आहे. त्याच वेळेला ‘इंडिया तायक्वांदो’ या संघटनेनेही नाशिकच्या मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलात ‘एशियन गेम्स’साठी निवड चाचणी आयोजित केली आहे.
विशेष म्हणजे ‘इंडिया तायक्वांदो’ या संघटनेला ‘एशियन गेम्स’मध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता नसल्यामुळे त्यांनी निवडलेला एकही खेळाडू या स्पर्धेकरिता पात्र ठरणार नाही. तरीही निवड चाचणी घेऊन खेळाडूंच्या भविष्याशी खेळ का सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या निवड चाचणीसाठी प्रत्येक खेळाडूकडून २ हजार ५०० रुपये नोंदणी शुल्क घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘इंडिया तायक्वांदो’च्या अध्यक्षांचा दावा ठरला फोल
- यासंदर्भात ‘इंडिया तायक्वांदो’ संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला जागतिक संघटनेची मान्यता असल्यामुळे ‘एशियन गेम्स’साठी पात्र ठरतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. परंतु, ‘हिंदुस्थान पोस्ट’ने वस्तुस्थिती पडताळली असता, ‘इंडिया तायक्वांदो’ ही संघटना ‘एशियन गेम्स’साठी नव्हे, तर ‘एशियन चॅम्पियनशिप’साठी पात्र आहे.
- कारण ऑलिम्पिक, एशियन गेम्स, साऊथ एशियन फेडरेशन गेम्स, नॅशनल गेम्स या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी स्पोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाची मान्यता लागते आणि ती ‘तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया’ला देण्यात आली आहे. उपरोक्त खेळांव्यतिरिक्त एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी साऊथ कोरिया येथील ‘वर्ल्ड तायक्वांदो’ या संस्थेची मान्यता लागते. तशी मान्यता ‘इंडिया तायक्वांदो’कडे आहे.
- एकूणच, ‘एशियन गेम्स’ आणि ‘एशियन चॅम्पियनशिप’मध्ये शब्दांचा खेळ करून खेळाडूंच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. त्यांच्याकडून नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे लुटले जात आहेत. राज्याचा क्रीडा विभाग याकडे काणाडोळा करीत असल्यामुळे अशा संस्थांचे फावले आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.