काँग्रेसने निलंबित केलेल्या आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली आहे. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अखेर आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. झालेल्या चुका विसरून माझी घरवापसी होत असून मी आमदाराकीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, असे स्पष्टच आशिष देशमुख यावेळी सांगितले.
(हेही वाचा – सेनेच्या वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार)
काही महिन्यांपूर्वी आशिष देशमुखांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य करून त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी आशिष देशमुखांवर निलंबनाची कारवाई केली. तेव्हापासूनच आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी रविवारी, १८ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थितांनी संबोधित करताना आशिष देशमुखांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘२०१९च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर नव्हे तर तलवार खुपसली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये विदर्भात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. फेसबुकशिवाय उद्धव ठाकरे कधीही विदर्भात दिसले नाही. यासंदर्भात मी तेव्हाही आवाज उठवला होता. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्व काम ठप्प झाले होते,’ असे देशमुख म्हणाले. तसेच काँग्रेस आणि गांधी परिवार ओबीसीद्रोही असल्याचे देखील आशिष देशमुख म्हणाले.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community