अनेक जनावरे मिळूनही वाघाची शिकार अशक्य; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

203
अनेक जनावरे मिळूनही वाघाची शिकार अशक्य; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
अनेक जनावरे मिळूनही वाघाची शिकार अशक्य; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघ असून अनेक जनावरे मिळूनही वाघाची शिकार करू शकत नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी रविवारी, १८ जून रोजी भाजपात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित जाहीर कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

‘मुळात विरोधकांकडे कोणताही चेहराच नाही’

यावेळी फडणवीस म्हणाले की, माझे म्हणणे शब्दश: घेऊ नका. मात्र, ज्याप्रमाणे जंगलात कितीही जनावरे एकत्र आली तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना कुणीही पराभूत करू शकत नाही. नरेंद्र मोदी हे राजकारणातील वाघ आहेत. जनसामान्यांच्या हितासाठी ते अविरत काम करत असतात. मन की बातच्या माध्यमातून देशातील २३, २४ कोटी जनतेशी ते थेट संवाद साधतात. जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. मुळात विरोधकांकडे कोणताही चेहराच नाही. नेतृत्व कुणी करावे, यावरूनच त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस नाराज झाली आहे. आपण काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. इतर राज्यांतही तशीच स्थिती आहे. ते एकमेकांनाच पाडण्याची तयारी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचा – कर्नाटकमध्ये अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध करतोच; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना उत्तर)

‘त्यामुळे वज्रमुठीत आता इतके तडे गेले आहेत’

उद्धव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे सरकार तुम्ही पाहिले आहे. ते केवळ घरीच बसणारे होते. स्वत: शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात यावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात केवळ दोनदाच आले, असे शरद पवार म्हणालेत. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मविआचे सरकार गेले. उद्धव ठाकरे यांचे जेमतेम १० आमदार देखील नाही. तरी वज्रमूठ सभेत येऊन आपलीच सभा असल्यासारखे ते हातवारे करतात. म्हणजे गर्दी इतर पक्ष जमवतात व तेथे उद्धव ठाकरे येऊन हातवारे दाखवतात. त्यामुळे वज्रमुठीत आता इतके तडे गेले आहेत की, त्यांची आता वज्रमुठ होऊच शकत नाही. राज्यात आपले सरकार येताच आपण शेतकरी, महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशिष देशमुखांवर आता भाजपच्या विदर्भ ओबीसी सेलची जबाबदारी असणार आहे. आशिष देशमुखांमध्ये माणसे जोडण्याची, नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांच्यामध्ये फक्त एकच कमतरता होती. ती म्हणजे ते आतापर्यंत भाजपसोबत नव्हते. त्यांनी आता भाजपवर श्रद्धा ठेवावी. त्यांचे पुढे काय करायचे?, हे आपण बघू. आशिष देशमुख यांनीही या कार्यक्रमात जाहीर घोषणा केली आहे की, ते पुढची विधानसभा, लोकसभा कोणतीच निवडणूक लढवणार नाही. ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी आम्हा कोणासोबतच चर्चा केली नाही, अशी घोषणा करायला धाडस लागते. मी आशिष देशमुख यांना विश्वासाने सांगतो की, त्यांनी कोणतीही चिंता करू नये. भाजप हाच त्यांचा अंतिम पक्ष असणार आहे असे फडणवीस म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.