नीलेश सिंगबाळ
गेल्या काही दिवसांपासून केवळ भारतात नाही, तर विश्वभरात हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहे. त्याच वेळी कट्टर भारतद्वेष्टे हिंदु राष्ट्राच्या विरोधात अपप्रचार करत आहेत. काही जण भारत धर्माधिष्ठित झाला, तर इस्लामी देश पाकिस्तानप्रमाणे भारताची स्थिती होईल, असे म्हणतात, तर खलिस्तानवादी नेते हिंदु राष्ट्रापेक्षा खलिस्तानवादाची कल्पना चांगली असल्याच्या वल्गना करतात. काही जण हिंदु राष्ट्रामुळे ‘सेक्युलर’ भारताला धोका असल्याचा, तसेच त्यामुळे गैरहिंदूंच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करतात; मात्र या अपप्रचारामध्ये काडीमात्रही तथ्यांश नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. हिंदु राष्ट्र ही कोणतीही राजकीय संकल्पना नाही, तर सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी असलेली एक आदर्श व्यवस्था आहे. ही कोणतीही नवीन राज्यव्यवस्था नाही, तर आतापर्यंत भारतात अनेक शतके ही राज्यव्यवस्था होती. भारत अनादि काळापासून हिंदु राष्ट्रच होते. त्रेतायुगातील राजा हरिश्चंद्र आणि प्रभु श्रीराम, द्वापरयुगातील महाराजा युधिष्ठिर, कलियुगातील राजा हर्षवर्धन, अफगाणिस्तानचा राजा दाहीर, मगधचा सम्राट चंद्रगुप्त, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदींचे राज्य कधीही ‘सेक्युलर’ नव्हते, तर ‘हिंदु राष्ट्र’च होते. या सर्व राज्यांचा उल्लेख आजही गौरवानेच केला जातो. खूप मागे जायला नको, वर्ष १९४७ मध्येही ५६६ संस्थाने हिंदु राज्ये होती. त्यामुळे हिंदु राष्ट्राला होणारा विरोध हा लोकांच्या उद्धाराला आणि सुव्यवस्थेला असलेला विरोध आहे, हे समजून घेऊन हिंदु राष्ट्रासाठी संघटित झाले पाहिजे.
हिंदु राष्ट्राची आवश्यकता
आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत; पण या ७५ वर्षांत भारताने ‘स्व’तंत्र अर्थात स्वतःचे म्हणजेच भारतीय तंत्र अभावानेच अनुभवले. वेशभूषा, कायदे, खाद्यसंस्कृती, आचार, शिक्षण, न्यायव्यवस्था, प्रशासनव्यवस्था आदी विभिन्न क्षेत्रांत, किंबहुना भारतियांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनावर आजही पाश्चात्त्य विकृतीचा पगडा आहे. ‘लोकांसाठी चालवलेले राज्य’ असे लोकशाहीचे वर्णन केले जात असले, तरी दैनंदिन जीवनात सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी मनस्तापच पडतो, असा अनुभव येतो. हे सगळे ‘सेक्युलर’ व्यवस्थेचे दुष्परिणाम आहेत. त्यामुळेच हिंदूंवर अन्याय करणाऱ्या, अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देणाऱ्या, बहुसंख्यांकांच्या धार्मिक आस्थांना ठेच पोचवणाऱ्या ‘सेक्युलर’ व्यवस्थेऐवजी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची मागणी एकमुखाने करायला हवी. देशांत आणीबाणी लागू असतांना वर्ष १९७६ मध्ये घटनादुरुस्ती करून काँग्रेस सरकारने ‘सेक्युलर’ शब्द राज्यघटनेत घुसडला. आता घटनादुरुस्ती करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे,अशी देशप्रेमी भारतियांची भावना आहे.
हिंदुत्वावरील आघात
भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत; पण यांपैकी ६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेश यांमध्ये हिंदु अल्पसंख्य झाले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची संख्या विचारात घेतली, तर आज २५ टक्के राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामंध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यानुसार एखाद्या प्रदेशातून हिंदू अल्पसंख्य होणे, म्हणजे त्या प्रदेशातील भारतियत्वाची भावना क्षीण होण्यासारखे आहे. वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादामुळे लक्षावधी काश्मिरी हिंदूंचे शिरकाण झाले. आज कलम ३७० रहित झाले असले, तरी विस्थापित काश्मिरी हिंदूंचे अद्याप तेथे पुनर्वसन झालेले नाही. याउलट हिंदूंच्या वेचून वेचून हत्या केल्या जात आहेत. हिंदु राष्ट्राचे ‘टार्गेट’ साध्य केल्याविना हिंदूंचे होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबणार नाही, हेच सत्य आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याची धर्माधांची ‘ब्लू प्रिंट’ समोर आली होती. त्याच्या आधीच ‘गजवा-ए-हिंद’चे स्वप्न कब्रस्तानात दफन करून हिंदुत्वाचे आणि पर्यायाने भारताचे रक्षण करण्यासाठी आपण सिद्ध झाले पाहिजे.
(हेही वाचा –Veer Savarkar Jayanti 2023 : काळानुसार हिंदूंना मार्गदर्शक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर विचार!)
आज वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदूंच्या संपत्तीला नख लावले जात आहे. केवळ हिंदूंची नाही, तर सरकारी भूमीही वक्फची भूमी म्हणून घोषित झाल्याचे प्रकारही उघडकीला आले आहेत. हिंदूंनी कष्टाने कमावलेली संपत्ती कोणत्याही क्षणी धर्मांध वक्फची संपत्ती म्हणून घोषित करू शकतात आणि त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही, हे हिंदूंना नामशेष करण्याचेच षड्यंत्र आहे. हिंदवी स्वराज्याची साक्ष देणारे अनेक गड-दुर्ग आज इस्लामी अतिक्रमणांनी वेढलेले आहेत. रातोरात गड दुर्गांवर दर्गे आणि मजारी उभ्या रहात आहेत. ‘वक्फ’सारखे काळे कायदे नष्ट करण्यासाठी, तसेच हिंदूंच्या अधिकारांच्या आणि मानबिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.
हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी आज वेगवेगळी ‘टूलकिट’ वापरली जात आहेत. कधी हिंदूंना फसवून, आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते, कधी कलास्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपट, मालिका, वेब सीरिज आदी माध्यमांतून हिंदूंच्या देवतांची आणि श्रद्धास्थानांची खिल्ली उडवली जाते, तर कधी भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अशी ‘हलाल अर्थव्यवस्था’ उभी करून हिंदूंना हलाल खाद्यपदार्थ घेण्यास बाध्य केले जात आहे. कधी हिंदूंच्या धर्मग्रंथांचे हनन केले जाते – ‘रामचरितमानस’सारख्या ग्रंथाला जाहीरपणे जाळले जाते, तर कधी मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि प्रथा-परंपरा यांना लक्ष्य केले जाते. हिंदु युवती आणि महिला यांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांचा पूर्ण उपभोग घेऊन ‘लव्ह जिहाद’ केला जातो. ‘मेरा अब्दुल अलग है’, अशा भ्रमात असणाऱ्या हिंदु मुलींना बुरखा घालण्याची, गोमांस भक्षण करण्याची, तसेच ‘इस्लाम कबूल’ करण्याची धमकी दिली जाते; अन्यथा त्यांच्या शरिराचे ३५ तुकडे केले जातात. ‘सेक्युलर’ भारत हिंदूंच्या श्रद्धांचे रक्षण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरला आहे, हेच या घटनांमधून दिसून येते. हिंदु युवतींच्या शीलरक्षणासाठी, हिंदु परंपरांच्या रक्षणासाठी, तसेच धर्मग्रंथांची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी हिंदु राष्ट्राची आज आवश्यकता आहे.
केवळ आर्थिक विकास अपुरा
जनता सुखी होऊन समृद्ध राष्ट्रासाठी केवळ आर्थिक विकास पुरेसा नसून जीवनाला व्यापणारी सर्व अंगे विकसित होणे आवश्यक असते. धर्म हा जीवनाच्या सर्वांगांना व्यापत असल्याने राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्माधिष्ठित असणेच आवश्यक आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र हे धर्माधिष्ठितच असेल! त्यागी आणि राष्ट्रहिताचा विचार करणारा धर्माचरणी समाज, कर्तव्यनिष्ठ सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली आणि कार्यक्षम प्रशासन, ही या ‘हिंदू राष्ट्रा’ची वैशिष्ट्ये असतील.
(लेखक हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community