‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते सतत चर्चेत होते. अशातच आता तारक मेहता का उलट चष्मा मालिकेतील एका अभिनेत्रीच्या तक्रारीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेतील अभिनेत्रीने प्रोड्युसर असित मोदीसह तीन जणांवर पवई पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पवई पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तक्रारदार पीडित अभिनेत्री ही ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेत काम करते. या अभिनेत्रीने राष्ट्रीय महिला आयोग दिल्ली येथे केलेल्या तक्रार अर्जावरून पवई पोलीस ठाण्यात मंगळवारी (२० जून) या मालिकेचे प्रोड्युसर असित मोदी, ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि एक्झिकिटिव्ह प्रोड्युसर जतीन बजाज यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३५४-ए (विनयभंग) ५०९ (धमकी देणे) ३४ सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा –आदिपुरुष : थिल्लर संवाद, रामायणाचे विडंबन, प्रेक्षकांच्या टीकेनंतर निर्मात्यांना जाग)
पीडित अभिनेत्री हिने अर्जात केलेल्या आरोपात म्हटले आहे की, असित मोदी हे तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होते, तसेच नको तिथे स्पर्श करीत होते, आणि मद्यप्राशन करण्यासाठी सतत आग्रह करीत होते. ऑपरेशन हेड सोहेल रमाणी हे सतत अश्लील भाषेत बोलून मानसिक छळ करीत असल्याचा आरोप पीडित अभिनेत्रीने केला आहे.
दरम्यान शूटिंगच्या वेळी सेटवर जतीन बजाज हे सतत अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. पवई पोलिसांनी पीडित अभिनेत्रीच्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community