मुंबई महापालिकेत उबाठाच्या लोकांनी जे गैरधंदे केले, त्याची एसआयटीमार्फत चौकशी होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे उबाठाचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा म्हणजे “चोर मचाए शोर” असा प्रकार आहे. लागली मिरची निघाला मोर्चा अशी गत आहे, अशी खरमरीत टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी कॅगने चौकशी करून आपला अहवाल जेव्हा विधानसभेच्या पटलावर ठेवला त्यावेळी उबाठाचे आमदार गप्प बसले याचा अर्थ त्यांची मूकसंमती होती. यांनी भ्रष्टाचार केला हे जणू मान्य केले. मुंबईकरांचा करातून जमा झालेला पैसा माझे कुटुंब आणि माझी जबाबदारीसाठी आणि माझे कुटुंब आणि माझे कंत्राटदार यासाठी जो खर्च झाला त्याची एसआयटी मार्फत चौकशी होणार म्हणून मिरची लागली का? हा निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवे. जे जे दोषी आहेत त्यांनी चौकशीला सामोरे जावे. कोविडच्या काळात एकिकडे जनता बेड साठी तडफडत होती तर त्याचवेळी उबाठाचे लोक आपल्या नातेवाईकांना कंत्राटे देण्यात गुंतले होते. त्यामुळे चौकशी व्हायलाच हवी.
मोर्चाचा विषय आज अचानक का आला? परवा शिबीर झाले, काल वर्धापन दिन झाला त्यावेळी मोर्चाचा विषयी काही बोलले नाही. आता जेव्हा चौकशी लागली आणि आपण पकडले जाणार हे कळले, तेव्हा आता मोर्चे काढणार आहेत. त्यामुळे हा प्रकार चोर मचाए शोर असा प्रकार आहे. मोर्चाचे नावच चोर मचाए शोर असे द्या, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
(हेही वाचा – Nashik : नाशिकमधील आदिवासी वसतीगृहात धक्कादायक प्रकार, अल्पवयीन विद्यार्थिनींशी केले गैरवर्तन)
दुसरं कारण स्पष्ट आहे, ज्यावेळी महाविकास आघाडीची वाताहत होते आहे, अशा वेळी आपल्या मुलाचे नेतृत्व उभे करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे हा मोर्चा केवळ आपल्या मुलासाठी आहे, मुंबईकरांसाठी नाही. जो ज्या भाषेत बोलणार त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर रामदास पाद्येंची पात्र घेऊन बोलणार असाल तर मग रामदास पाद्येंचा तात्याविंचू कोण? असे ही आम्ही विचारू असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत आधुनिक लखोबा लोखंडे
मनसेचे संदीप देशपांडे यांना जी मारहाण झाली त्यातील आरोपी सापडले असून मालकाला खूश करण्यासाठी हे केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या आरोपींचा तुमच्या पक्षाशी संबंध काय? हे उध्दव ठाकरे यांनी सांगावे. याबाबत बोलायला तयार नाहीत. पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारला म्हणून संदीप देशपांडे यांना स्टंप, बँट घेऊन जर मारहाण करता तर भविष्यात तुम्हाला दीड कोटी मुंबईकर पै आणि पैचा हिशोब विचारणार आहे, तेव्हा तुमच्याकडे तेवढे स्टंप आणि बँट आहेत का? असा उपरोधिक सवाल ही आमदार आशिष शेलार यांनी केला. तर संजय राऊत ज्या पध्दतीने बोलतात, स्वतःच धमकीचा बेबनाव करतात त्यावरून त्यांना आधुनिक लखोबा लोखंडे म्हणावे का? असा टोला ही त्यांनी लगावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community