गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला ओम राऊत यांचा आदिपुरुष हा चित्रपट अखेर १६ जून रोजी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटावर प्रचंड टीका होत आहे. अनेकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. तर सोशल मीडियावरून अनेकांनी निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांच्यावर सडकून टीका केली आहे.
या टिकेमागील मुख्य कारण म्हणजे चित्रपटातील थिल्लर संवाद, रामायणाचे विडंबन, गरजेपेक्षा अधिक VFX चा वापर.
आदिपुरुष हा चित्रपट पाहिल्यानंतर रामायण कसं दाखवू नये याचं उत्तम उदाहरण सादर केल्याची टीका अनेकांनी सोशल मीडियावरून केली आहे. आदिपुरुषमधील काही संवाद प्रेक्षकांना खटकले असून त्यावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
(हेही वाचा – ED Raid : गुजरातमधील छापेमारीत १.६२ कटींची रोकड जप्त)
या सिनेमाच्या विरोधात काही हिंदुत्वादी संघटनाही मैदानात उतरल्या आहेत. तर नेपाळमध्ये ही या सिनेमावरून वादंग उठला आहे. हा सिनेमा काठमांडूत दाखवला जाणार नाहीये. आता या वादात शिंदे गटानेही उडी घेतली असून शिंदे गटाच्या खासदाराने मोठी मागणी केली आहे.
पत्राद्वारे मागणी
शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आदिपुरुष सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आदिपुरुषमुळे भारताची बदनामी होत असल्याचा दावा श्रीरंग बारणे यांनी केला आहे. श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रसून जोशी यांना पत्र लिहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सिनेनिर्मात्याची चांगलीच कोंडी झाली आहे.
चित्रपटातील संवाद बदलणार
सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स आता बदलण्यात येणार आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली असून संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ट्विट करत संवाद बदलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी सांगितलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community