बेकायदेशीर ‘डब्बा ट्रेडिंग’ रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; एकाला अटक

430

बेकायदेशीर ‘डब्बा ट्रेडिंग’ रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी कांदिवलीतून ४५ वर्षीय एका शेअर्स ब्रोकरला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला शेअर ब्रोकर हा बेकायदेशीररित्या शेअर्स बाजारातील स्टॉक एक्सचेंज चालवून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करीत होता अशी माहिती समोर आली आहे. बेकायदेशीर डब्बा ट्रेंडिंगचा मागील ४ महिन्याचा टर्न ओव्हर तपासला असता तो ४,६७२ कोटींचा असल्याचे समोर आले असून त्याने शासनाचा सुमारे २ कोटींचा महसूल बुडवला आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष ११च्या पथकाकडून शेअर ब्रोकर म्हणून काम करणाऱ्या जतीन सुरेश मेहताला कांदिवली येथून बेकायदेशीर शेअर ट्रेडिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर येथे असणाऱ्या संकेत बिल्डिंग मधील एका कार्यालयात बेकायदेशीर स्टॉक एक्सचेंज चालवीत होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि भारताच्या मल्टी-कमोडिटी एक्सचेंजच्या प्रतिनिधींसह गुन्हे शाखा कक्ष ११च्या चौकशीत मेहता यांच्याकडे शेअर्सचा व्यापार करण्यासाठी कोणताही परवाना किंवा परवानगी नसल्याचे चौकशीत समोर आले. तसेच मेहताला स्टॉक एक्स्चेंज चालवण्याची कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नव्हती आणि ते ‘मूडी’ नावाचे ॲप्लिकेशन वापरून बेकायदेशीर शेअर ट्रेडिंग चालवत होता आणि विविध शासकीय कर बुडवून शासनाची फसवणूक करीत होता.

मेहता यांच्या कार्यालयावर पोलीस पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला असता छाप्यादरम्यान, गुन्हे शाखेने कार्यालयातून ५० हजार रुपये रोख आणि पाच मोबाईल फोनसह लॅपटॉप, टॅब आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. हे उपकरण अवैध शेअर ट्रेडिंगसाठी वापरले जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मेहता एक अप्लिकेशन वापरत होता आणि स्पॉट ट्रेडिंग करत होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मेहताच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या ट्रेडिंगची यादी तपासल्यानंतर आर्थिक व्यवहार हे रोखीने करण्यात आलेले होते. मार्च २०२३ ते २० जून दरम्यान आरोपींकडून ४,६७२ कोटींचे शेअर ट्रेडिंग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

(हेही वाचा – ED Raid : गुजरातमधील छापेमारीत १.६२ कटींची रोकड जप्त)

तपासादरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की, मेहता यांनी सुरक्षा व्यवहार कर आणि भांडवली नफा कर, राज्य सरकारचे मुद्रांक शुल्क, सेबी टर्नओव्हर शुल्क, स्टॉक एक्सचेंज ट्रेडिंग महसूल भरण्याचे टाळून शासनाचा सुमारे १.९५ कोटींचा महसूल बुडवला असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक यांनी सांगितले. अटक आरोपी सुरेश मेहता यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत आणि सुरक्षा करार नियमन कायद्याच्या अंतर्गत विश्वासभंग, फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून मेहता यांना न्यायालयात हजर केले असता २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय?

डब्बा ट्रेडिंगला बॉक्स ट्रेडिंग किंवा बकेट ट्रेडिंग असेही म्हणतात. हे अधिकृत स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेरून बेकायदेशीर स्टॉक एक्सचेंज चालवून शासनाचा कर बुडवला जातो. एखाद्या विशिष्ट स्टॉकच्या जागेची मालकी घेण्यासाठी प्रत्यक्ष व्यवहार न करता स्टॉकच्या किमतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून बेकायदेशीर सट्टेबाजी करण्यात येते. स्टॉकच्या किमतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याच्यावर बेटिंग, जुगार खेळला जातो यालाच डब्बा ट्रेंडिंग असे म्हणतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.