आता ‘त्या’ प्रकरणाचा तपासही एनआयए करणार!

आता या प्रकरणात सुद्धा एनआयएने उडी घेतल्याने नेमके काय उघडकीला येणार, हे पहाणे आता महत्त्वाचे असणार आहे.

193

राज्यात गाजत असलेल्या मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सुद्धा आता एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. हा तपास आधी राज्यातील दहशतवाद विरोधी पथका(एटीएस)कडे सोपवण्यात आला होता. पण आता या प्रकरणात सुद्धा एनआयएने उडी घेतल्याने नेमके काय उघडकीला येणार, हे पहाणे आता महत्त्वाचे असणार आहे.

अशी होणार तपासाची सुरुवात

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयए करत असतानाच आता मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास देखील एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार एनआयए आता हिरेन यांची स्कॉर्पिओ ज्या ठिकाणाहून चोरीला गेली, तिथून आपल्या तपासाची सुरुवात करणार आहे. मनसुख हिरेन यांचे वकील गिरी यांना एनआयएने चौकशीसाठी बोलावले आहे. विक्रोळी पोलिस ठाण्यातील संबंधित पोलिसांची सुद्धा एनआयएकडून चौकशी करण्यात येणार आहे. एटीएसने ठाणे गुन्हे शाखेच्या एका अधिका-याकडे मनसुख हिरेन प्रकरणात चौकशी केली होती. एनआयए या अधिकाऱ्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः २५ फेब्रुवारी ते १७ मार्च अंबानी-हिरेन प्रकरणाची संपूर्ण ‘पटकथा’…)

कधी झाला हिरेन यांचा मृत्यू

ज्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्यात आली ती वापरत असलेल्या मनसुख हिरेन यांची पोलिसांकडून सतत चौकशी करण्यात येत होती. त्यामुळे हिरेन या प्रकरणातील एकमेव दुवा होते. पण त्यांचा ५ मार्च रोजी त्यांचा मृतदेह कळवा येथील खाडीत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. सकाळी १०.३०च्या सुमारास त्यांचा मृतदेह कळवा खाडीत पोलिसांना सापडला. तसेच हिरेन हे ४ मार्च रोजी रात्री घरातून बाहेर पडले पण उशिरापर्यंत घरी न आल्याने, त्यांच्या कुटुंबियांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

वाझेंना पीपीई किट घालून फिरवले

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीबाबत संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे यांची एनआयएकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. अंबानींच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेली पीपीई किट घालून चालणारी व्यक्ती सचिन वाझे असावी, या संशयातून शुक्रवारी रात्री १०.३०च्या सुमारास सचिन वाझे यांना तिथे नेऊन, पीपीई किट घालून चालण्यास सांगत, संपूर्ण घटनाक्रमाचे नाट्यरुपांतर करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.