ठाकरे गटाच्या फारुख शेखच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा

वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं.

279
ठाकरे गटाच्या फारुख शेखच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा

कोरोना काळातील गैरप्रकारासंबंधी ईडीकडून काल म्हणजेच २१ जून रोजी ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांची १७ तास चौकशी सुरु होती. त्यानंतर आज म्हणजेच गुरुवार २२ जून रोजी ठाकरे गटाच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईतील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे.

वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. ते बांधकाम आज मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं आहे. कोणतीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून तिथे बोर्ड लावण्यात आले होते, शिवाय कार्यालय तयार करण्यात आलं होतं. त्यावर देखील महापालिकेने कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते फारुख शेख यांचे हे कार्यालय होते.

(हेही वाचा – आदिपुरुष सिनेमावर बंदी आणा; शिंदे गटाच्या खासदाराने केली केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून मागणी)

हे कार्यालय (शाखा) अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. तब्बल ४० वर्षांपासून ही शाखा तेथे अस्तित्वात होती. त्यामुळे या कारवाईवरून आता राजकारण तापले आहे.

या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून ज्या पद्धतीने तोडक कारवाई करण्यात येते, तशीच कारवाई आज २२ जून रोजी करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याला विरोध करत होते. परंतु हे बांधकाम करताना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. सोबतच बीएमसीला विचारणा देखील करण्यात आली नव्हती. त्यामुळेच अनधिकृत बांधकाम पाडत असल्याचं मुंबई महापालिकेकडून पदाधिकारी आणि माध्यमांना सांगण्यात आलं. महापालिकेकडे या कार्यालयाची अधिकृत कागदपत्रे नव्हती, नोंद नव्हती असं देखील महापालिकेकडून सांगण्यात आलं.

पाडकाम सुरु असताना काही काळ तणावाचं वातावरण होतं. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे. सलग दोन दिवस ठाकरे गटावर कारवाई सुरु असल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.