मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण २३ जून २०२३ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता होणार आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती परिषदेच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
८५ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. २०२२च्या पुरस्कारांचे वितरण २३ जून रोजी मुंबईत नितीन गडकरी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावर्षी बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना दिला जाणार आहे. २५ हजार रुपये रोख मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार दिनू रणदिवे, मा.गो.वैद्य, पंढरीनाथ सावंत आदि मान्यवर पत्रकारांना दिला गेला आहे.
(हेही वाचा – BMC : जी -२० शिष्टमंडळाच्या मुख्यालयातील हेरिटेज वॉकसाठी महापालिकेलाच मोजावे लागले ७९ हजार रुपये)
जीवन गौरव पुरस्काराव्यतिरिक्त आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना, शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार न्यूज १८ लोकमतचे मिलिंद भागवत यांना, प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार सकाळचे मारूती कुंदले यांना, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार धुळयाचे बापू ठाकूर यांना, नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर यांना, रावसाहेब गोगटे स्मृती पुरस्कार संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार अलिबागचे पत्रकार मोहन जाधव यांना दिला जात आहे. शिवाय संतोष पवार स्मृती उत्कृष्ट प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार धुळ्याचे पत्रकार गोपी लांडगे यांना दिला जाणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, मुंबईचे विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community