गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या वास्तूचा पुनर्विकास करून त्या जागेत मराठी नाट्य विश्व आणि मराठी रंगमंच कलादालन निर्माण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने वारंवारच्या मुदतवाढीनंतरही कोणताही निर्णय प्रशासनाने न घेतल्याने अखेर काढता पाय घेतला आहे. जून २०२२मध्ये या कामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राट कामाला मंजुरी दिल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने तीन वेळा प्रशासनाला विधीग्राहयता वाढवून दिली. परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून कामाचा कार्यादेश न दिला गेल्याने अखेर कंत्राटदाराने पुन्हा विधीग्राह्यता वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे या कामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारानेच कंटाळून हे कामच सोडण्याचा निर्णय घेतल्याने आता प्रशासनाला हे कंत्राट कामचे रद्द करून नव्याने कंत्राट काढावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या कामावर कायमचाच पडदा पडल्याचे उघड झाले आहे. गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेवर सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात असून याच्या बोधचिन्हाचे अनावरण मे २०२२ मध्ये राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी पार पडले होते. या भूखंडाची मालकी राज्य सरकारकडे आहे.
काही वर्षांपूर्वी हा भूखंड राज्य सरकारने महापालिकेला भाडेतत्वावर दिला होता. त्यानंतर या जागेवर बिर्ला क्रीडा केंद्राची वास्तू बिर्ला समुहाने बनवली आणि सभागृह महापालिकेला सुपूर्द केला होता. कालांतराने ही वास्तू जुनी झाल्याने तसेच वापरात नसल्याने पडून राहिल्याने याजागी मराठी नाट्यविश्व उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तयार केला आणि त्यासाठी शासनाच्यावतीने खर्च करण्याची तयारीही दर्शवली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन तळमजले अधिक तीन मजली इमारतीचे टेरेस फ्लोअरसह काम करण्याचा आराखडा तयार केला. त्यात तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था, पहिल्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत मराठी नाट्य विश्वाशी निगडीत बांधकाम करण्यात येणार आहे, सुमारे ६०० आसन क्षमतेचे हे नाट्यगृह असून १५० आसनी एम्पिथिएटर, कॅफेटेरिया, गच्चीवर बगीचा व खुला रंगमंच, मराठी रंगभूमीचे कलादालन अशा बाबींचा समावेश आहे. या वास्तूच्या बांधकामासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या कामांसाठीच्या कंत्राट कामासाठी निविदा मागवून मनिषा प्रोजेक्ट्स, सी.ई.इन्फा आणि आर अँड बी या एमसीआर जेव्ही या पात्र कंपनीची निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते आज पुरस्कारांचे वितरण)
या कंत्राट कामाला मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा कार्यादेश मिळणे आवश्यक होते. परंतु सरकारकडून निधी मिळत नसल्याने प्रशासनाने कार्यादेश दिला नसून यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराची विधीग्राह्यता संपल्यानंतर संबंधित कंत्राट कंपनीकडून प्रशासनाने याची विधीग्राह्यता वाढवून घेतली. अशाप्रकारे आतापर्यंत तब्बल तीन वेळा विधी ग्राह्यता वाढवून दिल्यानंतरही कंपनीला कार्यादेश न बजावल्याने संबंधित कंपनीने यापुढे विधी ग्राह्यता वाढवून न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कंपनीनेच आता पूर्णपणे माघारच घेतल्याने हे कंत्राट रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या कलादालनाचा खर्च आता सरकारकडून न मिळाल्याने हा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे की सरकारच्या निधीची वाट प्रशासन पाहणार हेच स्पष्ट नसल्याने हे कंत्राट रद्द करून प्रकल्पच गुंडाळून ठेवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community