Mumbai Police : ‘आप मुझे दो लाख दो, मै बॉम्बब्लास्ट रुकाऊंगा’, मुंबई पोलिसांकडेच मागितली खंडणी 

248

मुंबईतील अंधेरी, कुर्ला आणि पुण्यात २४ जून रोजी बॉम्बस्फोट होणार आहे, तुम्ही मला दोन लाख रुपये दिल्यावर मी हे बॉम्बस्फोट थांबवू शकतो, या आशयाचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला आणि एकच खळबळ उडाली होती. या कॉलरची माहिती मिळवून मुंबई पोलिसांनी यूपीतील जोनपूर दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मलेशिया येथे जाण्यासाठी पैशांची गरज असल्यामुळे या दोघांनी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. आंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांना मुंबईत आणल्यानंतर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला गुरुवारी सकाळी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या कॉलने मुंबईसह पुण्यात एकच खळबळ उडवून दिली होती. कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तीने ‘मुंबईतील अंधेरी, कुर्ला परिसर आणि पुण्यात २४ जून रोजी संध्याकाळी बॉम्बस्फोट करण्यात येणार आहे, त्यासाठी त्याला पैसे देण्यात आले आहे, जर हे बॉम्बस्फोट थांबवायचे असल्यास मला दोन लाख रुपये द्या, मी माझ्या सहकाऱ्यासह मलेशिया येथे निघून जाईल’, असा दावा केला होता. या विचित्र धमकीमुळे पोलीस काहीसे चक्रावले परंतु ही धमकी गंभीरतेने घेत आंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

(हेही वाचा ईडीच्या अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती खरेदी खात्यातून त्या फायलिंमधील कागदपत्रे घेतली ताब्यात)

दरम्यान पोलिसांनी कॉल करणाऱ्या अनोळखी कॉलरचा तांत्रिकरीत्या शोध घेतला असता, हा कॉल उत्तर प्रदेशातील जोनपूर येथून आल्याचे तपासात समोर आले, दरम्यान मुंबई पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा काढून उत्तर प्रदेशातील जोनपूर पोलिसांच्या मदतीने या दोघांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांना जोनपूर येथून ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक युपीला रवाना झाले असून या दोघांना लवकरच ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंबईत आणून या दोघांना अटक केल्यानंतर या दोघांकडे चौकशी करण्यात येणार असून चौकशी नंतर धमकीचे कारण समोर येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.