हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत अखेर पावसाने हजेरी लावली. शनिवारी, 24 जून रोजी दुपारपासून किरकोळ पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाल्यानंतर मुंबई शहर व उपनगरात सायंकाळी ५ वाजल्यापासून जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. त्यामुळे पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा जलद गतीने न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. माटुंगा गांधी मार्केट, शीव परिसर, मालाड व दहिसर सबवे आदी ठिकाणी परंपरेनुसार तुंबलेच. परंतु अनेक मार्गांवर पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवर वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. याचा परिणाम मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर झाला.
मुंबईत रात्री आठ वाजेपर्यंत शहरात ६५.६० मिमी, पूर्व उपनगरात ६९.८६ मिमी आणि पश्चिम उपनगरात ७३.५७ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. तर रात्री आठ ते नऊ या वेळेत शहरात हलका पाऊस, तर पश्चिम उपनगरातील WS- दहिसर अग्निशमन दल ४९ मिमी, बोरिवली अग्निशमन केंद्र ४८ मिमी, बोरिवली पश्चिम ४७ मिमी, कांदिवली अग्निशमन केंद्र ४२ मिमी, चिंचोली अग्निशमन केंद्र ३२ मिमी आणि मालाड पश्चिम स्टेशन परिसर २७ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. तर पूर्व उपनगरात गव्हाणपाडा अग्निशमन केंद्र २५ मिमी, मुलुंड अग्निशमन केंद्र २३ मिमी आणि भांडुप कॉम्प्लेक्स आदी परिसरात १९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांत उपनगरात आकाश ढगाळ राहून जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
(हेही वाचा पहिल्याच पावसात शिवाजीपार्क मैदान तलावसदृश्य)
दिवसभरात ३१ झाडे पडली
या पावसात झाडे तथा त्यांच्या फांदया पडण्याच्याअनेक घटना घडल्या असून त्यातील शहर भागात ०४ व पूर्व उपनगरात २ पश्चिम उपनगरात २५ अशा एकुण ११ ठिकाणी झाडे, फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या.झाडे/फांदया तोडण्याचे व उचलण्याचे काम सुरु आहे. कुठलीही मनुष्य हानी नाही. मलबार हिल वाळकेश्वर रोड येथील बिर्ला शाळेजवळ एक झाड कोसळून पडल्याने येथील दहा वाहनांचे नुकसान झाले आहे.
पाणी तुंबल्याने बेस्ट मार्ग वळवले
सायन रोड नं.२४ येथे पावसाचे पाणी भरल्याने सायन सर्कल ते सायन स्टेशन सिग्नल दरम्यान नियोजित मार्ग बंद करुन व्हाया सायन रोड नं.३ ए मार्गे बसमार्ग ७,२२,२५,३०२,३१२,३४१ च्या बसगाड्या सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.
तर दहिसर सबवे येथे पाणी साचल्यामुळे बस मार्ग क्रमांक ए २०८ ,२०७,७०७,मर्यादित ,७२०यांचे प्रवर्तन सुधीर फडके उड्डाणपूल ,बोरिवली मार्गे सव्वा आठ वाजल्यापासून वळवण्यात आली होती. साईनाथ सबवे, मालाड येथे पाणी साचल्यामुळे बंद केला आहे, त्यामुळे २०. १५ वाजल्यापासून बस मार्ग क्रमांक ३४५ व ४६० हे गोरेगाव मदिना मंजिल उड्डाण पुलावरून परावर्तित केले आहेत. तर बस मार्ग क्रमांक २८१ ची वाहतूक साईनाथ रोड येथेच खंडित करण्यात आली.
शॉर्ट सर्किटच्या ०७ घटना
शहरात ३, पूर्व उपनगरात ०२ व पश्चिम उपनगरात ०२ अशा एकुण जे शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या. पश्चिम उपनगरात एका ठिकाणी घराचा काही भाग पडल्याची तकार प्राप्त झाली असून संबंधित विभागाला कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले.