Aditya Thackeray : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘स्वागता’वर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

262

राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले. यावरुन माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्याचाही समाचार घेतला. शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना लाज वाटली पाहिजे.

नालेसफाईची पाहणी मिंधे गट आणि भाजपने केली होती, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबईत वेगवेगळ्या रेस्ते कंत्राटांमध्ये घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे केले आहेत, मी अनेक रस्त्यांचे घोटाळे समोर आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

(हेही वाचा Land Jihad : भाईंदरमध्ये लँड जिहाद; सरकारी जमिनीवर बांधला दर्गा; ‘हिंदू टास्क फोर्स’ने उघडकीस आणले )

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान निर्लज्जपणाचे, नाकर्तेपणाचे आहे. भ्रष्टाचारचा चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे. यापूर्वी कोणत्याच नेत्याने मुंबईकरांना असे उत्तर दिलं नाही, की तक्रार काय करता, याचं स्वागत करा. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसाठी जेव्हा महामार्गावरील गाड्या थांबवल्या जातील. तेव्हा मुख्यमंत्री बोलतील, ‘तुम्ही गर्दीत अडकलाय, तक्रार काय करता. माझं स्वागत करा.’ एवढा निर्लज्जपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

मुंबईत शनिवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर ‘अरे बाबा, पाऊस झाला याचे स्वागत करा, पाणी साचल्याची तक्रार काय करता,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. या वक्तव्यावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.