Ajit Pawar : अजित पवारांचा प्रदेशाध्यपदावर ‘डोळा’; विरोधी पक्षनेतेपदी मन रमेना; सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष नेमल्यापासून अस्वस्थता वाढली

177
  • सुहास शेलार

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यापासून सुप्रिया सुळे यांनी काही वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने पक्षावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले असून, सुळे यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष पद हाती घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते पद सोडण्याची तयारीही दर्शविली आहे.

सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदी नेमणूक करून शरद पवार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले, अनेकांना सूचक इशारेही दिले. सुळे यांच्या खांद्यावर महाराष्ट्रासह, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, इतर राज्यांकडे फारसे लक्ष न देता सुप्रिया यांनी महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या शरद पवारांच्या निष्ठावंताच्या मदतीने त्यांनी पक्षावरील स्वतःची पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अजित पवारांचे समर्थक असलेल्या आमदारांना येन केन प्रकारेण आपल्या बाजूला वळवण्यासाठी त्या विशेष प्रयत्नशील आहेत.

(हेही वाचा Land Jihad : भाईंदरमध्ये लँड जिहाद; सरकारी जमिनीवर बांधला दर्गा; ‘हिंदू टास्क फोर्स’ने उघडकीस आणले )

२०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार यांचे बंड फसले असले, तरी आजमितीला त्यांच्या पाठिशी राष्ट्रवादीतील किमान ३५ ते ४० आमदार आहेत. त्यामुळे त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यास ते कोणताही निर्णय घेऊ शकतात, ही बाब शरद पवार यांना ज्ञात आहे. त्यामुळे थेट प्रहार न करता, हळुवारपणे अजित पवारांची ताकद कमी करण्याचे नियोजन आखले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार समर्थक आमदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. ‘दादां’पेक्षा ‘ताई’ किती ताकदवान आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे. त्यासाठी येत्या काळात संबंधित आमदारांच्या मतदारसंघात दौरे, विशेषतः आमदारांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांशी संवाद, असे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ही बाब अजित पवार यांच्या कानी येताच, सतर्क होत त्यांनी एक पाऊल मागे येण्याचे ठरवले असून, प्रदेशाध्यपद स्वतःच्या हाती घेण्याची तयारी सुरू केल्याचे कळते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनाच्या निमित्त षण्मुखानंद सभागृहात बोलताना त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समक्ष पक्ष संघटनेतील पद देण्याची मागणी केली. या मागणीवर शरद पवार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसला, तरी समर्थक आमदारांकरवी अजित पवार यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.