मणिपूर येथे जवळपास मागील एका महिन्यापासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. यावरून देशातील राजकारण देखील तापले आहे. सध्याच्या मणिपूरच्या स्थितीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. अशातच भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विविध राजकीय पक्षांचे नेते मणिपूरमधील प्रचलित परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शनिवारी (२४ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित होते.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि पोलिसांनी राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच मणिपूर पोलीस आणि सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत या जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराशी संबंधित १२ बंकर उद्ध्वस्त केले आहेत.
(हेही वाचा – ‘उध्दव ठाकरेंच्या १५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात भ्रष्ट महापालिका’ – श्रीकांत शिंदे यांचे टीकास्त्र)
पोलिसांनी सांगितले की, तामेंगलाँग, इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, कांगपोकपी, चुराचंदपूर, उखरुल आणि कांकचिल जिल्ह्यात लोकांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. जाळपोळीच्या ५ हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत.
मणिपूरमध्ये इंटरनेट बंद
मणिपूरमध्ये मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढण्यात आल्यानंतर हिंसक संघर्ष झाला. या हिंसाचारात आतापर्यंत १३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. राज्यात सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही दिवस म्हणजेच २५ जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकताच अमेरिका आणि इजिप्तचा दौरा करून पंतप्रधान मोदी मायदेशी परतले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community