महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना करण्यात याव्यात. भरारी पथकांची स्थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, यासंदर्भातील तक्रारींची तत्काळ चौकशी करुन प्राथमिक माहिती अहवाल नोंदविण्यात यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवारी, 26 जून रोजी दिले.
मुंबईतील विधान भवनात सोमवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आणि गोरक्षा समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नार्वेकर बोलत होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे गोवंश हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोरक्षक कार्यकर्त्याची (शेखर रापेल्ली) समाजकंटकांकडून झालेली हत्या, ६ अन्य कार्यकर्ते गंभीर जखमी होणे तसेच गोरक्षक कार्यकर्त्यांविरूद्ध खोटे गुन्हे नोंदविण्यात आल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी अधिक माहिती घेतली.
(हेही वाचा PM Modi Visit US : गुजरातमध्ये अमेरिकेच्या दोन मोठ्या कंपन्यांची होणार गुंतवणूक)
या बैठकीला अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पशू कल्याण मंडळाचे कमलेश शाह, विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र गौशाळा संपर्क प्रमुख लक्ष्मीनारायण चांडक, गोरक्षा आणि गोसेवा क्षेत्रात कार्य करणारे डॉ. विनोद कोठारी, रमेश पुरोहित, ॲड. राजू गुप्ता, ॲड. सिद्ध विद्या, रिटा मकवाना, अशोक जैन, संदीप भगत, गणेश परब, जनक संघवी उपस्थित होते.
सुस्पष्ट धोरण आखा!
महाराष्ट्राच्या सीमेवर अन्य राज्यातून गोहत्येसाठी होणारी पशू वाहतूक रोखण्यात यावी, भरारी पथके स्थापन करण्यात यावीत, गोरक्षक कार्यकर्त्यांविरूद्ध खोटे गुन्हे नोंदविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. पशूमांस तपासणी यंत्रांचा (मिट टेस्टिंग मशीन्स) वापर करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी नार्वेकर यांनी दिले. येत्या दहा दिवसांत यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा विधान भवनात बैठक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भातील संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येऊन सुस्पष्ट धोरण आखून गृहविभागाच्या माध्यमातून गोरक्षा उद्दिष्टाची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community