राज्यातील एकीकडे ‘औरंगजेब’ वरून अनेक वाद सुरु असतांना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या एका वाक्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही सहभाग होता, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून आरोप – प्रत्यारोपला सुरुवात झाली आहे. विविध राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.
प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगाजेबाच्या कबरीवर गेले होते. तिथे त्यांनी काय वक्तव्य केलं, ते सगळ्यांनी ऐकलं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. प्रसारमाध्यमांशी बोलतांना फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली.
(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारने ज्या योजना राबविल्या त्या बेकायदेशीर आहेत का? प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“औरंगाजेबाने संभाजी महाराजांवर अत्याचार आणि छळ करण्याचं एकमेव कारण होतं, ते म्हणजे, संभाजी महाराज सातत्याने देव, देश आणि धर्माची लढाई लढत होते. संभाजी महाराजांना ती लढाई सोडून आपला धर्म बदला, आमच्या धर्मात या आणि आम्हाला नतमस्तव व्हा, असं सांगितलं जात होतं. मात्र छत्रपती शिवरायांच्या छाव्याने अत्याचार सहन केले. पण औरंगजेबाची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार करून औरंगजेबाने त्यांना मारलं आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये,” असा टोला फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
देशात सध्या जुन्या राजांचं उदाहरण देऊन समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. त्यांच्या (संभाजी महाराज) हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही होते. हत्येच्या कटात त्यांचाही सहभाग होता, यावर इतिहासकारांनी सविस्तर लिहायला हवं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community