कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आंबेनळी घाटात दरड कोसळली. त्यामुळे तेथील मार्ग बंद झाला आहे. मंगळवारी (२७ जून) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. पोलादपूरपासून २१ ते २२ किमी अंतरावर ही दरड कोसळली आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ही दरड हटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती.
पाऊस सुरू झाल्यावर महाड आणि पोलादपूर भागात विविध ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. तसेच पोलादपूर तालुक्यात पैठण ते पांगळोलीमार्गे ओंबळी रस्त्यावरही दरड कोसळल्याची घटना घडली होती. प्रशासनाकडून ही दरड हटविण्यात यश मिळविल्याची माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली आहे. महाड प्रशासनही या सगळ्यावर लक्ष ठेऊन आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
(हेही वाचा – बकरी ईद सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्या २५ परीक्षा)
आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. हा राज्य महामार्ग क्रमांक ७२ आहे. साधारण ४० किमी लांबीचा हा रस्ता आहे. या घाटाची उंची २ हजार फुटांहून जास्त आहेत.
महाबळेश्वर ते पोलादपूरमध्ये दोन घाट आहेत ‘फिट्झेराल्ड’ हा महाबळेश्वर ते वाडा कुंभरोशीपर्यंत आहे. तर, दुसरा ‘आंबेनळी’ हा कुंभरोशी ते पोलादपूरपर्यंत आहे. जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो. या घाटात अपघातांच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. त्यामुळे दरड कोसळल्याचं समजताच दोन्ही बाजूंनी हा घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी ताम्हणी घाटाचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community