बिपरजॉय चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सून लांबला होता. अखेर आता देशात सर्वत्र मान्सूनला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन – तीन दिवसांपासून राज्यातील पावसाने जोर धरला आहे. मात्र पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले असून काही ठिकाणी दुर्घटना घडली आहे. अशातच आज म्हणजेच बुधवार 28 जून रोजी सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा – आंबेनळी घाटातल्या कालिका माता पॉईंटजवळ कोसळली दरड, घाट वाहतुकीसाठी बंद)
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही. मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होत आहेत.
मागील तीन तासात मुंबईत पडलेल्या पावसाची आकडेवारी
ठाणे – 50.04 मिमी
कुलाबा – 54 मिमी
दिंडोशी – 39 मिमी
कासारवडवली – 44 मिमी
डोंबिवली पश्चिम – 35 मिमी
डोंबिवली पूर्व – 31 मिमी
मुंब्रा – 48 मिमी
ऐरोली – 41 मिमी
मुंबई विमानतळ – 38 मिमी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community