मागील काही दिवसांपासून दादर भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने जी उत्तर विभागाच्या वतीने मीनाताई ठाकरे फुल मार्केटमधील विक्रेत्यांसह हमाल व नोकरांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकही फुल विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नसला तरी या फुलांच्या मालाची ने-आण करणारे ६ हमाल व नोकर पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे याठिकाणी मास्कशिवाय कुणालाही प्रवेश न देण्याचे निर्देश देत या मार्केटच्या प्रवेशद्वारावर तपासणीकरता खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
२१५ जणांची केली चाचणी!
कोरोना संसर्ग वाढत असल्याने माँसाहेब मिनाताई ठाकरे फुल मंडईत शनिवारी जी/उत्तर विभागा मार्फत २१५ व्यक्तीची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये एकही परवानाधारक कोरोना पाॅझिटीव्ह आले नसल्याची माहिती जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण या चाचणीत मंडईत हमाली करणारे ६ हमाल तसेच नोकर कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यांना पुढील उपचाराकरीता वनिता समाज हाल शिवाजी पार्क येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
(हेही वाचा : लेटरबॉम्बनंतर महाआघाडीचे मंत्री भूमिगत!)
मार्केटच्या प्रवेशद्वारावर खासगी सुरक्षा रक्षकाची नेमणूक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता मार्केटच्या प्रवेशद्वारावर खाजगी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जी व्यक्ती मास्क लावत नाही त्याना मंडईत प्रवेश दिला जात नाही. व जे मास्क लावत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मंडईचे व्यापारी मंडळ कोरोनाला रोखण्याकरीता सहकार्य करत असल्याचे दिघावकर यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community