मुंबई मेट्रोने प्रवासी संख्येचा एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्येनं २ लाखांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे. पावसाळ्यातही न थांबता धावणाऱ्या मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ वर मंगळवारी २ लाख, ३ हजार, ५८१ मुंबईकरांनी प्रवास केला.
मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यापासून म्हणजेच २० जानेवारी ते २७ जून २०२३ या ५ महिन्यांच्या कालावधीत २,४४,१६,७७५ प्रवाशांनी मुंबई मेट्रोनं प्रवास केला. मुंबईकरांना अतिवृष्टीमुळे त्रास होणार नाही नाही याची काळजीही मुंबई मेट्रोनं घेतली आहे. मुंबई मेट्रो मुसळधार पावसातही विना व्यत्यय आपली सेवा सुरु राहिल याची सर्वतोपरी काळजी आधीच घेण्यात आली आहे. नागरिकांसाठी महा मुंबई मेट्रोने मान्सून कंट्रोलरूम देखील सुरु केली आहे. प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ कॅमेरा प्रत्येक घटनेची नोंद घेत आहे.
विनाव्यत्यय किंवा सीमलेस प्रवासासाठी सुरु करण्यात आलेल्या मुंबई-१ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेला देखील नागरिकांनी पसंती दिली आहे. आतापर्यंत जवळपास १,१४,१७१ प्रवाशांनी मुंबई वन कार्डाचा लाभ घेतला आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचा डोस लागू : आयुक्त सकाळपासूनच तुंबणाऱ्या भागांची पाहणी करण्यासाठी रस्त्यांवर उतरले)
… तर अतिरिक्त मेट्रो चालवणार
“प्रदूषण विरहित, सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या मेट्रोला मुंबईकरांनी नेहमीच पसंती दिली, त्याबद्दल मुंबईकरांचे आभार. महा मुंबई मेट्रोही नागरिकांच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ही आता २ लाखांच्या पार गेली आहे आणि आम्हला विश्वास आहे की, मुंबईकरांच्या अशाच उदंड प्रतिसादामुळे आम्ही असेच अनेक महत्वाचे टप्पे (माईलस्टोन) गाठत राहू. टप्पा २च्या लोकार्पणानंतर दर महिन्याला प्रवासी संख्येत सरासरी ५ टक्के वाढ होत आहे. पावसाळ्यातही मुंबई मेट्रो सेवा अशीच अविरत सुरु राहील याकडे सातत्याने आमचं लक्ष आहे. जर अतिवृष्टीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली तर अतिरिक्त मेट्रो चालवण्याची तयारीही महा मुंबई मेट्रोनं ठेवली आहे.” असं महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच महानगर आयुक्त, एमएमआरडीए डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community