मुंबई पोलिसांनी मॅनहोल वरील झाकणे चोरणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. मागील ४८ तासात समता नगर आणि गावदेवी पोलिसांनी मॅनहोल वरील झाकणे चोरणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोन टोळ्यांमधील चौघांना अटक केली आहे. ही टोळी थोड्या पैशांसाठी मुंबईतील विविध ठिकाणाची मॅनहोल वरील झाकणे चोरी करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळत होती.
सगीर अब्बास सय्यद (२२), इरफान अक्रम शेख (२३) या दोघांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. मुंब्रा आणि वरळी परिसरात राहणाऱ्या या दोघांनी वरळी, माहीम, काळबादेवी इत्यादी परिसरातील मॅनहोल वरील लोखंडी झाकणे चोरी करून भंगार विक्रेत्यांना विकली असून विकलेल्या पैशांतून हे दोघे नशा करीत असे अशी माहिती पोलिसांनी दिली. झाकणे विकत घेणाऱ्या भंगार विक्रेत्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या दोघांविरुद्ध मनपा कडून नुकताच गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गावदेवी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या दोघांची ओळख पटवून दोघांना डोंगरी परिसरातून अटक केली आहे.
(हेही वाचा – Mumbai Metro : मुंबई मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या पोहोचली २ लाखांवर)
दरम्यान बोरिवलीच्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी एका गुन्ह्यात कमलेश उर्फ बंटी जगदीश सोलंकी (२२) आणि चोरीचा माल विकत घेणारा भंगार विक्रेता अब्दुल गणी मोहमद नजीर शहा (५१) या दोघांना दहिसर परिसरातून अटक करण्यात आली आहे. या दोघांजवळून पोलिसांनी २६ मॅनहोल वरील लोखंडी झाकणे हस्तगत केली आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर मुंबई महानगर पालिकेला जाग आली असून महानगर पालिकेने मुंबईभर चोरी गेलेल्या मॅनहोल वरील झाकणांविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मनपाच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी मॅनहोल वरील झाकणे चोरणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community