बुधवारी सकाळपासून धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईसह महानगरात अनेक ठिकाणी ‘तुंबई’ झाली. शिवाय मागाठाणे मेट्रो स्थानकालगतची जमीन खचल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महा मुंबई मेट्रो, एमएमआरडीए आणि मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर मेट्रोसाठी कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव मागाठाणे मेट्रो स्थानकात आत आणि बाहेर जाणाऱ्या मार्गांत तात्पुरते बदल करण्यात आले. प्रशासनाने सुरक्षेचा निर्वाळा दिला असला, तरी या दुर्घटनेमुळे बांधकामांच्या दर्जावर स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कोणाच्या जीवाचे बरे वाईट झाले असते, तर जबाबदार कोण? असा सवालही केला आहे.
(हेही वाचा – Tree Fell : दिवसभरात झाड पडून मुंबईत दोन तरुणांचा मृत्यू)
‘मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यावरील काही भाग खचला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काही तात्पुरते बदल केले आहेत. मागाठाणे स्थानकाच्या उत्तरेकडील जिना/सरकता जिना तात्पुरता बंद आहे. उत्तरेकडील लिफ्ट बंद ठेवण्यात आली आहे. बाधित जागेकडील कॉनकोर्सचा भागही प्रतिबंधित करण्यात आला आहे. मेट्रो सेवेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही’, असे स्पष्टीकरण महामुंबई मेट्रो संचलन महामंडळातर्फे देण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community