गृहमंत्री कोण अनिल देशमुख की अनिल परब? देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल 

पोलीस महासंचालक पदी असताना सुबोध जैस्वाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या अधिकाऱ्यांनी पोलीस खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे अहवाल सरकारला दिले होते, त्यावर जर तेव्हाच कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

127

माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांविरोधात लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालय कोण चालवत आहे, अनिल देशमुख की अनिल परब?, असा सवाल उपस्थित केला आहे. नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर वेगवेगळे खुलासे होत आहेत. परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून धक्कादायक खुलासा केला आहे. याआधी सुद्धा असे खुलासे झाले आहेत. पोलीस महासंचालक पदी असताना सुबोध जैस्वाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या अधिकाऱ्यांनी पोलीस खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे अहवाल सरकारला दिले होते, त्यावर जर तेव्हाच कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तोवर आंदोलन सुरूच राहणार!

जेवढ्या गाड्या जप्त झाल्या त्या गाड्या कोण कोण वापरत होते, याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. भाजपने आजपासून आंदोलन सुरू केले, ते आंदोलन जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि गृहमंत्र्यांच्या राजीनामा होत नाही तोपर्यंत सुरू राहील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : उद्यापर्यंत देशमुखांवर निर्णय घेऊ! – शरद पवार )

चौकशी कुणाची करणार?

दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन थेट पवारांनाच सवाल केले आहेत. ज्युलिओ रिबेरो चांगले अधिकारी आहेत. हे हुशार आहेत. पण अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डीजी रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल करतानाच केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार आहे की देशमुख यांचीही चौकशी होणार आहे. त्याचा खुलासा पवारांनी करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. वाझेंची नियुक्ती सिंग यांनी केल्याचे पवारांनी सांगितले ते खरे आहे. पवारांनी सत्य सांगितले. पण ते अर्धसत्य आहे. सिंग यांच्या समितीनेच वाझे यांना पदावर घेतले. मात्र राज्य सरकारच्या आदेशानंतरच त्यांनी वाझे यांना पदावर घेतले होते. हे सत्य असून पवारांनी हे सत्य सांगितले पाहिजे, असेही ते म्हणाले. शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यांनी बनवलेल्या सरकारला डिफेन्ड करावा लागते. त्यांची गोष्ट मी समजू शकतो.  पण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि निर्देशानुसार झाले, असे देखील फडणवीस म्हणाले. सचिन वाझेंकडे आलिशान गाड्या सापडल्या आहेत. गेल्या सहा-आठ महिन्यांत या गाड्या कोण कोण मोठे लोक वापरत होते, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे!

  • विविध प्रकारचे खुलासे होत आहे, राज्याचे पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रातून जो खुलासा केला हा धक्कादायक
  • असा खुलासा करणारे परमवीर सिंग पहिले अधिकारी नाहीत.
  • याआधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी शासनाला अहवाल दिला आहे.
  • पोलीस बदलातील पैशाची दलाली, पैशाचे व्यवहार ही सर्व माहिती त्यात दिली होती.
  • तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता, तो गृहमंत्र्यांकडे गेला, तरीही कारवाई झाली नाही.
  • शरद पवार म्हणाले परमवीर सिंग पदावर नसताना आरोप केले.
  • पण जैस्वाल पदावर असताना त्यांनी आरोप केले होते.
  • कंटाळून केंद्राच्या सेवेला निघून गेले आहेत.
  • रश्मी शुक्लांच्या अहवालावर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती.
  • राज्य सरकार ते रिपोर्ट बाहेर काढणार नाही.
  • शरद पवार हे या सरकारचे निर्माते आहेत.
  • त्यामुळे सरकार वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न असणारच.
  • सरकार काय झोपल होते का?
  • बदल्यांच्या रॅकेटमध्ये वारंवार गृहमंत्र्यांचे नाव
  • पवार साहेब म्हणतात ते अर्ध सत्य आहे.
  • मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशिर्वादाने वाझेंना घेण्याचे काम परमवीर सिंग यांनी केले.
  • परमवीर सिंग यांच्या पत्रात मी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांना सांगितले आहे असे म्हटले आहे.
  • मग त्यावर हे सर्व का गप्प आहेत?
  • पदावर असताना याची चौकशी होऊच शकत नाही.
  • त्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे राज्याचे गृहखाते कोण चालवते हे समोरं आले पाहिजे.
  • कारण अनिल परब हेच सभागृहात गृहखात्यावरील प्रश्नावर उत्तर देताना आम्ही पाहिले आहे.
  • भाजपने आजपासून आंदोलन सुरु केले आहे.
  • जोवर या प्रकरणाचा छडा लागत नाही, गृहमंत्री राजीनामा देत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहणार.
  • महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम करण्याचे काम होत आहे.
  • गृहमंत्र्यांचा राजीनामा जोवर घेणार नाही तोवर भाजपचे आंदोलन सुरूच राहणार.
  • वाझेंकडे असलेली गाडी 6 महिने कोण वापरत होते?
  • सचिन वाझे किती वेळा गृहमंत्र्यांसोबत दिसले हे देखील समोर यायला हवे.
  • सरकारच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे.
  • जर परमवीर यांनी जे पत्र लिहिले हे भाजपची स्क्रिप्ट असेल तर वाझेंनी जे केले ती शिवसेनेची स्क्रिप्ट आहे का?
  • शरद पवार बोलतात ते अर्धसत्य आहे.
  • राज ठाकरे यांनी देखील सांगितले की जर याची चौकशी झाली तर अनेक फटाके फुटतील.
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दयायला हवा.
  • आमच्या काळात टार्गेट देण्यासाठी टार्गट लोक नव्हते.
  • आज पहिल्यांदा संजय राऊत यांनी आत्मचिंतन केले आहे.
  • पत्रातील चॅन अत्यंत महत्वाचा
  • राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्य आहे. यात केंद्राने लक्ष दयायला हवे.
  • या सरकारची विश्वासहारता संपलेली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.