वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रमुख नेत्यांची एक उच्चस्तरीय बैठक बुधवारी (२८ जून) नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोषही उपस्थित होते. या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि बहुप्रतिक्षित २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर या बैठकीत महत्वपूर्ण झाली. एवढेच नव्हे तर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सरकार आणि पक्ष संघटनांमधील संभाव्य बदलांवरही चर्चा झाली असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीदरम्यान मंत्रिमंडळातील सदस्यांना समाजातील गोरगरीब आणि मागासलेल्या घटकांच्या गरजा तसेच समस्यांकडे खास लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच प्रत्येकांनी आपल्या क्षेत्रातील समस्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असल्याचेही सांगितले आहे. आपल्या क्षेत्रातील गरिबांच्या समस्या काय आहेत? आणि त्या सोडविण्यासाठी काय काय करावे लागेल? याकडे विशेष लक्ष द्या, असे मोदी म्हणाले. गरीब आणि वंचित घटकांकडे विशेष लक्ष द्या. योजनांमध्ये गरीब-मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करा. दुर्बल घटकांमध्ये जा. गरिबांना थेट फायदा होईल अशा योजना करा. प्रगतीशील आणि सर्जनशील विचार करा, अशा विविध सूचना पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळातील सहका-यांना केल्यात. अमेरिकेहून परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी ही बैठक घेतली, हे येथे उल्लेखनीय.
(हेही वाचा – गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार)
दरम्यान, तब्बल पाच तास चाललेल्या या बैठकीत मोठ्या फेरबदलावर चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा ६, ७ आणि ८ जुलैला देशभरातील भाजप नेत्यांची बैठक घेणार असल्याचेही वृत्त आहे. या बैठकीला राज्याचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संघटनमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व बडे नेते सहभागी होऊ शकतात. नड्डा ६ जुलै रोजी पूर्व विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ७ जुलै रोजी उत्तर, ८ जुलै रोजी दक्षिण विभागाची बैठक होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community