पावसाळ्यातील मत्स्य प्रजननाच्या कालावधीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकांच्या विरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील करंजा बंदरावर धाड घालून बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. राज्य सरकारने १ जून २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात यंत्रचलित तसेच यांत्रिकी नौकांना मासेमारी करण्यास मनाई केली आहे. तरीही हा मनाई आदेश धुडकावून यांत्रिकी नौका मासेमारी करत असल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्या होत्या. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या तक्रारींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त महेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय विभागाने दोन दिवसांपूर्वी करंजा बंदरावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत अनेक नौकांसह मत्स्य वाहतूक करणारे रिक्षा, ट्रक, टेम्पो आदी सुमारे ७५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय मत्स्य नौका मालक, तांडेल, खलाशी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचे पत्र उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले.
(हेही वाचा – राम कृष्ण हरीच्या गजराने राजधानी दुमदुमली; पंधरा किलोमीटर सांकेतिक वारीने महाराष्ट्रीयन संस्कृतीचे घडविले दर्शन)
या कारवाई दरम्यान कारंजा संस्थेचे अध्यक्ष आणि संचालकांनी धुडगूस घालून जमाव गोळा करून त्यास चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. धुडगूस घालणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच धाडीत जप्त करण्यात आलेल्या नौका नष्ट करण्याची कठोर कारवाई विभागाकडून केली जाणार आहे. नौकांवरील नाव, नंबर पुसून अवैध मासेमारी करण्याची पद्धत हा सागरी सुरक्षेसाठी मोठा धोका मानला जात आहे. त्यामुळे ही पद्धत मत्स्य विभागाशिवाय सागरी पोलिसांना देखील एकप्रकारचे आव्हान ठरत आहे. या कारवाईत मत्स्य व्यवसाय विभागाचे अभय देशपांडे, संजय पाटील तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community