मुंबई : पंढरपुरी विठुरायाचरणी नतमस्तक झाल्यानंतर गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दाखल झाले खरे; पंरतु भाजपा श्रेष्ठींचा फोन खणाणताच ते लागोलाग दिल्लीसाठी रवाना झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनवर जात राज्यपालांची भेट घेतल्यामुळे सरकारच्या वर्षपूर्तीला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त साधला जाईल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेनेत उभी फूट पडून राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात जे नवे सरकार अस्तित्वात आले, त्यास ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या दिवशी करून विरोधकांना सूचक संदेश द्यायचा शिवसेना-भाजपाचा विचार आहे. त्यासाठी शिंदेंना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आल्याचे कळते. कारण, दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करताना शिवसेनेकडील पाच मंत्र्यांना नारळ द्यावा, अन्यथा सरकारची प्रतिमा सुधारणार नाही, असा अहवाल राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी दिल्लीकडे केली आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील मंत्र्यांना बाजूला करण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे यासंदर्भात मध्यस्थ तोडगा काढून मंत्रिमंडळ विस्तार करण्यासंदर्भात शिंदेंच्या दिल्लीवारीत निर्णय होऊ शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेची मुदत संपुष्टात यायला केवळ एक वर्ष शिल्लक असल्याने आता पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. त्यात एकूण २१ मंत्री शपथ घेतील. त्यातील १४ कॅबिनेट, तर ७ राज्यमंत्री असतील. कॅबिनेट मंत्रिपदांपैकी भाजपाला १०, तर शिवसेनेच्या वाट्याला ४ मंत्रीपदे येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे त्यातील दोन पदे अपक्ष आमदारांना सोडणार आहेत.
(हेही वाचा – राम कृष्ण हरीच्या गजराने राजधानी दुमदुमली; पंधरा किलोमीटर सांकेतिक वारीने महाराष्ट्रीयन संस्कृतीचे घडविले दर्शन)
राज्यमंत्री पदांचा विचार करता भाजपामधून ४ आणि शिवसेनेकडून तीन आमदार शपथबद्ध होतील, असे कळते. भाजपमधून माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, योगेश सागर, माधुरी मिसाळ, किसन कथोरे, राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर; तर शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, यामिनी जाधव, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नावे समोर येत आहेत.
जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होणार?
– सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह २० मंत्री आहेत. त्यातही मोजक्याच मंत्र्यांवर अनेक खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मदतीला राज्यमंत्री नसल्याने अधिवेशन काळात त्यांच्यावर कामाचा मोठा ताण येतो.
– पालकमंत्री म्हणूनही एका मंत्र्याकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक जिल्हे आहेत. त्याचा ताण जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेवर येत आहे.
– शिवाय मंत्रिमंडळ विस्तार राखडल्याने इच्छुक आमदारांमधील निराशा वाढत आहे. आता जून महिन्यात विस्तार झाला, तर हे सगळेच प्रश्न मार्गी लागतील.
– सध्याच्या मंत्रिमंडळात आणखी २० मंत्र्यांची भर पडली की जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होण्याचीही शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community