मागील वर्षी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट आणि यंदा रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर होणार खड्डे बुजवण्यासाठी: परंतु रॅपिड हार्डनिंगचे पैसे महापालिकेने थकवले

257
मागील वर्षी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट आणि यंदा रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर होणार खड्डे बुजवण्यासाठी: परंतु रॅपिड हार्डनिंगचे पैसे महापालिकेने थकवले
मागील वर्षी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट आणि यंदा रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर होणार खड्डे बुजवण्यासाठी: परंतु रॅपिड हार्डनिंगचे पैसे महापालिकेने थकवले

मुंबई महानगरात पावसाळ्यात रस्त्यांवर निर्माण होणारे खड्डे जलदगतीने भरता यावे म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. खड्डे भरण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर केला जात आहे. या कामासाठी मुंबईत विभागनिहाय कामासाठीची जबाबदारी निश्चित करून खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली आहे. या अस्फाल्टचा वापर एच पूर्व विभागात खार सबवे येथे करण्यात आला आहे. मात्र, मागील पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी विविध तंत्राचा प्रयोग करण्यात आला होता, त्यात रॅपिड हार्डनिग काँक्रिटचा वापर करण्यात आला होता. परंतु मागील पावसाळ्यात या नवीन तंत्राचा वापर केलेल्या कंत्राटदारांना आजही महापालिकेने पैसेच दिले नसल्याची माहिती समोर आली आहे.

मागील जुलै महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासकांसह इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्त्यावरील खड्डे यापुढे दिसता कामा नये अशाप्रकारचा सज्जड दम भरला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या सुचनेनुसार अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी रस्ते विभागाच्या माध्यमातून रस्त्यांवरी खड्डे भरण्यासाठी विविध तंत्राचा वापर केला. त्यामध्ये रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील अनेक भागांमध्ये मागील वर्षी या काँक्रिटचा वापर करण्यात आला. यासाठी सात परिमंडळांमध्ये कंत्राटदारांची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत या तंत्राद्वारे खड्डे बुजवण्यात आले. परंतु यासर्व कंत्राटदारांनी बुजवलेल्या खड्डयांचे पैसे आजतागायत महापालिका प्रशासनाने दिले नाही. या तंत्राचा वापर करत एकप्रकारे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी सरकारच्या माध्यमातून पाठिवर कौतुकाची थाप मारुन घेतली. परंतु या रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर करण्यात आल्यानंतरही वर्ष उलटत आले तरी रस्ते विभागाला पैसे देता आलेले नाही. रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता वारंवार महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे फाईल नाचवत आहे.परंतु या फाईलकडे पाहण्याकडे वेलारासू यांना वेळच नसल्याचे बोलले जात आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी तातडीने खड्डे बुजवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या मुंबईत तीन ठिकाणी रिॲक्टीव्ह अस्फाल्टच्या मिश्रणाचा वापर करत तीन ठिकाणी पथदर्शी प्रकल्प राबविल्याची माहिती पी. वेलरासू यांनी दिली. मुंबईकरांना उत्तम दर्जाचे रस्ते देण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे उपायुक्त (पायाभुत सुविधा) उल्हास महाले यांनी नमूद केले. खार भुयारी मार्ग येथे गुरुवारी दिनांक २९ जून २०२३) खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. याठिकाणी रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा वापर करून तात्काळ रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यात आली. खड्डे बुजवण्यासाठी रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा वापर करत एक पथदर्शी प्रयोग काही दिवसांपूर्वीच पार पडला. पथदर्शी प्रकल्पामध्ये मिश्रणाच्या वापराचा यशस्वी परिणाम आढळून आला. म्हणून मिश्रणाचा वापर संपूर्ण महानगरात करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. रस्ते विभागाने प्रत्येक विभागनिहाय हे मिश्रण रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पुरवले आहे.

(हेही वाचा – रायगड जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्मोद्योग क्लस्टर, केंद्र शासनाकडून १२५ कोटी मंजूर)

असा आहे वापर –

रिॲक्टीव्ह अस्फाल्ट हे केमिकल मिश्रीत डांबर आहे. महत्वाचे म्हणजे एरवी पाण्याच्या संपर्कात आल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे तयार होतात, मात्र रिॲक्टीव्ह अस्फाल्टच्या मिश्रणावर पाणी टाकूनच खड्डा भरण्यात येतो. केमिकलची पावडर, खडी आणि पाणी या मिश्रणाचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येतो. रिअॅक्टीव्ह अस्फाल्टमधील केमिकल पावडरवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक सुरू करता येते, असे मिश्रणाचे वैशिष्ट्य आहे. मुंबईतील सर्व २४ विभागांना मिश्रणाच्या पिशव्या पुरविण्यात आल्या आहेत. इकोग्रीन इन्फ्रा डेव्हलपमेंट या कंपनीकडून हे तंत्रज्ञान विभागांना पुरवण्यात आले आहे. त्यातील केमिकल पावडरची आयात करण्यात आली आहे.

रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचाही होणार वापर –

गतवर्षीच्या पावसाळ्यात महानगरपालिकेकडून रॅपिड हार्डनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी नऊ सेवा पुरवठादारांच्या माध्यमातून मुंबई महानगरात रॅपिड हार्डनिंगचा वापर करण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या वापरातही महानगरपालिकेला यश मिळाले. मात्र या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कोरड्या पृष्ठभागाची गरज असते. रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिगचा वापर केल्यानंतर या रस्त्यावरून सहा तासांनी वाहतूक सुरू करणे शक्य होते.

कोल्डमिक्सचा पुरवठा –

मुंबईतील सहा मीटर आणि त्यापेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या परिरक्षण खात्यामार्फत कोल्ड मिक्सचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व विभागात आतापर्यंत १३०० मेट्रिक टन कोल्डमिक्स खड्डे बुजवण्यासाठी पुरवण्यात आले आहे. तर २०० मेट्रिक टन कोल्ड मिक्स राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट आणि यावर्षी रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर करत खड्डे भरण्याचे तंत्र यशस्वी झाल्याने या तंत्राद्वरे खड्डे बुजवले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.