वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी रालोआ सोडून गेलेल्या घटक पक्षांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच शंकेमुळे नितीश कुमार यांनी आमदार आणि खासदारांना बोलावून चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार समान नागरी संहिता विधेयक संसदेच्या पटलावर ठेवण्याची तयारी करीत आहे. याशिवाय, रालोआ सोडून गेलेल्या मित्र पक्षांना पुन्हा भाजपासोबत आणण्याकरिता त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. एवढेच नव्हे तर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटक पक्षांच्या खासदारांना स्थान देण्याचीही योजना मोदी यांनी आखली आहे. यामुळे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत खदखदत होता तसाच लाव्हा जेडीयूत खदखदत आहे. मोदी यांच्या एकजुटीच्या प्रयत्नांत हा लाव्हा फुटला तर जेडीयूला सेनेसारखे भगदाड पडल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सुशासनबाबू यांच्या मनात निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी – चंद्रकांत पाटील)
कदाचित म्हणूणच, नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणूक तयारीचा बहाणा करून पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करायला सुरवात केली आहे. या माध्यमातून ते पक्षातील नेत्यांच्या मनात काय सुरू आहे? याचा पत्ता लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला लोकांमध्ये जावून त्यांच्या समस्या समजून घेण्याची गरज आहे. शिवाय, निधीअभावी एखादे काम अडकून पडले असेल तर त्याचा पाठपुरावा सरकारकडे करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
नितीश कुमार गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री निवासस्थानी आमदारांची भेट घेत होते. शुक्रवारी दुपारी जेडीयू आमदारांच्या भेटीची प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी दुपारी १२.३० नंतर जेडीयू नगरसेवकांशी बोलायला सुरवात केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची दखल घेतली. या बैठकीची मालिका आता मुख्यमंत्री पुढे नेणार आहेत. लवकरच जेडीयू खासदारांच्या भेटीची प्रक्रिया सुरू होणार आहे. वन टू वन मीटिंग सुरु झाली. मुख्यमंत्र्यांची जेडीयू आमदारांसोबतची बैठक वन टू वन होती. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बोलावलेल्या आमदारांना एकाच ठिकाणी बसवण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आमदाराशी त्यांच्या दालनात स्वतंत्रपणे चर्चा केली. आमदार आणि एमएलसीशी त्यांचे संभाषण सरासरी दहा ते बारा मिनिटे चालले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community