मुंबईतून मागील वर्षभरात हरवलेले तसेच चोरीला गेलेल्या ३८ हजार ६६७ मोबाईल फोन पैकी ११ हजार ५६ मोबाईल फोन चा ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ (सीईआयआर) या पोर्टलच्या माध्यमातून शोध लावण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखे अंतर्गत येणाऱ्या वेब डेव्हलपेंट सेंटरच्या पथकाच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
मुंबई शहरासह उपनगरात मोबाईल फोन चोरीच्या घटनांमध्ये मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोबाईल चोरीच्या घटनांसह मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारीत देखील वाढ झाली आहे. चोरीचे अथवा गहाळ झालेले मोबाईल फोन यांची परराज्यात मोठी मागणी असल्यामुळे मुंबईतून थेट हे चोरीचे मोबाईल फोनची परराज्यात तस्करी केली जाते, त्या ठिकाणी या मोबाईल फोनचे ‘आयईएमआय’ बदलून काळ्या बाजारात या मोबाईल कमी किमतीत विक्री करण्यात येते.
(हेही वाचा – समान नागरी संहिता विधेयक याच अधिवेशनात सभापटलावर; मंत्रिमंडळ आणि संसदेच्या समितीची ३ जुलैला बैठक)
मुंबईतून मागील वर्षभरात चोरी आणि गहाळ झालेल्या मोबाईल फोनची संख्या मोठी असून वर्षभरात ३८ हजार ६६७ मोबाईल फोन गहाळ व चोरीला गेल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या होत्या. या तक्रारीवरून मुंबई गुन्हे शाखेच्या वेब डेव्हलपमेंट सेंटरच्या पथकाने वर्षभरात गहाळ झालेले आणि चोरीला गेलेल्या ३८ हजार ६६७ मोबाईल फोन पैकी ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ (सीईआयआर) या पोर्टलच्या माध्यमातून ११ हजार ५६ मोबाईल फोन ट्रेस (शोध) करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘लॉस्ट अँड फाउंड’ या सदराखाली सदरची सेवा सर्वसामान्य नागरिकांकरीता सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ठिकाणी गहाळ झालेल्या अथवा चोरीला गेलेल्या मोबाइल फोनची सविस्तर माहिती भरावी, या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वेब डेव्हलपमेंट सेंटरचे अधिकारी मोबाईल फोनचा शोध घेतात. या प्रकारे वेब डेव्हलपमेंट सेंटरने ११ हजार ५६ मोबाईल फोन चा छडा लावला आहे. वेब डेव्हलपमेंट सेंटर, गुअवि, गुन्हे मुंबई या शाखेच्या सदर प्रशंसनीय कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व मुंबई शहरातील नागरिकांकडून कौतूक होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community