मुंबई पालिका हे देशाचे महत्त्वाचे शक्तीपीठ आहे. पण, आज खोके सरकारच्या भ्रष्टाचाराने पालिकेला पोखरून टाकले आहे. हे जे भयानक चित्र मुंबईमध्ये तयार झालेले आहे, ते आपल्याला बदलायचे आहे. मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचे त्यांचे मनसुबे उधळून लावायचे आहेत. ते मला पप्पू म्हणतात. मग हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतोय, या अंगावर. एकटे या, सगळी फौज घेऊन या. छातीवर वार झेलायची माझी तयारी आहे, असे आव्हान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला दिले.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात ठाकरे गटाने मुंबई पालिकेवर मोर्चा काढला. यात शिवसेनेचे नेते, उपनेते, आमदार-खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. मुंबई पालिकेजवळ मोर्चा थांबल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदित्य म्हणाले, मुंबई पालिका हे देशाचे महत्त्वाचे शक्तीपीठ आहे. पण, आज तिची स्थिती काय आहे? पालिकेत जनप्रतिनिधी नाहीत. दाराला कुलूप लागलेले आहे. प्रशासक फक्त खोके सरकारचा फोन घेतात. सर्वसामान्यांचा आवाज त्यांना ऐकू जात नाही. तुम्ही बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून आलात, तर तुमच्या स्वागतासाठी गालिचा अंथरला जाईल. पण सामान्य नागरिक म्हणून गेलात हाकलून लावले जाईल, असा कारभार सध्या तेथे सुरू आहे.
(हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार – मुख्यमंत्री)
या खोके सरकारच्या भ्रष्टाचाराची सगळी माहिती नव्या राज्यपालांकडे दिली, निष्पक्ष चौकशीची मागणी केली. त्यांनी होकार दिला. परंतु, प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा राज्यपालांकडे जाणार आहोत. मुंबई पालिकेवर जशी एसआयटी चौकशी लावलीत, तशीच ठाणे, नाशिक, नागपूर औरंगाबाद, पुणे पालिकेवर लावा. या सरकारच्या मागच्या वर्षभरातील कामांवर लावा. तुम्हाला हमी देऊन सांगतो, घोटाळ्यांशिवाय त्यातून काहीही बाहेर येणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
‘डीसीएम’ म्हणजे’दुसरा मुख्यमंत्री’
खोके सरकारने घोषणा केलेली कामे कुठेच दिसत नाहीत. चौकाचौकात फलक मात्र दिसतात. त्यावर दोनच फोटो. एक अलिबाबाचा आणि दुसरा ‘डीसीएम’ म्हणजेच ‘दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचा’. मुंबईत इतके भयानक वातावरण कधीही बघितले नव्हते. फोडाफोडीवर यांचा भर आहे. एक-दोन आयपीएस अधिकाऱ्यांवर त्यांनी फोडाफोडीची जबाबदारी दिली आहे. ते नगरसेवकांना फोन करून ऑफर देत आहेत. त्यांचे रेकॉर्डिंग हातात आले आहे. ते जिथे दाखवाचे तिथे बरोबर दाखवणार आहे. कर्नाटकमध्ये मागे ४० टक्क्यांचे सरकार होते. पण महाराष्ट्रात १०० टक्के भ्रष्टाचारी सरकार आहे, असा आरोपही आदित्य यांनी केला.
आमचे सरकार येईल, त्यादिवशी त्यांना तुरुंगात पाठवणार
– निवेदन वैगरे देणार का, असे मला कोणी विचारत होते. पण मी म्हटले चोरांना काय निवेदन देणार? त्यांना आज सांगून ठेवतोय, तुम्ही जी चोरी केली आहे, ती आमच्या नजरेत आली आहेत. त्याच्या फायली आम्ही बनवल्या आहेत. ज्या दिवशी आमचे सरकार येईल, त्यादिवशी तुम्हाला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
– रस्ते घोटाळा, खडी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन खरेदी घोटाळा, असे अनेक घोटाळे यांनी केले आहेत. मुंबईतील हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. त्यामुळे आजपासून शांत बसायचे नाही, घरोघरी आपल्याला शिवसेनेचा बुलंद आवाज पोहोचवायचा आहे. ही शिवसेना मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी लढणार. मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचे यांचे मनसुबे उधळून लावणार, असेही आदित्य म्हणाले.
पालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर – राऊत
मोदी, शहा, फडणवीस आणि मिंदे-फिंद्यांची एकच इच्छा आहे, भ्रष्टाचार करायचा असेल, तर आमच्या पक्षात या. आणि स्वाभिमानाने भ्रष्टाचार करा. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीत रहाल तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. पण, मुंबईकरांचे एकच सांगणे आहे, निवडणुका घ्या. चोर कोण आणि शोर कुणाचा, हे तुम्हाला दाखवून देवू. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे यंत्रणा असेल, तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा भव्य मोर्चा पहा, तुमच्या डोळ्यांची बुबुळे बाहेर येतील. मुंबईचे रक्षण करण्याची हिम्मत कोणात असेल, तर ती शिवसेनेत. आज शनिवार आहे, पालिकेला सुट्टी असली, तरी काही उंदीर बिळात लपून या मोर्चावर नजर ठेवून आहे. पण, या महानगरपालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे आणि तो कुणाला पुसता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community