महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तीन वर्षांत तीनवेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते पाहिले राजकारणी ठरले आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रविवारी सकाळी अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. अजित पवार यांनी आपण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत असल्याची माहिती दिली. बैठकीत सहभागी झालेल्या दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि अदिती तटकरे वगळता एकाही आमदाराला याबद्दल माहिती नव्हती.
(हेही वाचा Ajit Pawar : राज्यात राजकीय भूकंप; राष्ट्रवादी फुटली; अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार)
अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना आपल्या निर्णयाची कल्पना दिल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने बैठकीतून बाहेर येत शरद पवार यांच्या कानावर सगळी हकीकत घातली. त्यानंतर पुन्हा बैठकीत सहभागी होत अजित पवार आणि समर्थक आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे मतपरिवर्तन करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी देवगिरी बंगल्यावरून काढता पाय घेतला.
त्यानंतर अजित पवार समर्थक आमदारांसह राजभवनात दाखल झाले. त्याआधी भाजपाचे मंत्री आणि वरिष्ठ नेते राजभवनात पोहोचले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनवर दाखल झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत शिंदे-फडणवीस आणि पवार यांनी बैठक झाली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत शपथविधी सोहळा पार पडला.
(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवार राजभवनात दाखल; विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार की मंत्रिपदाची शपथ घेणार?)
Join Our WhatsApp Community