अजित पवार यांनी महायुतीची साथ देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेश काँग्रेसचे अनेक नेते गुढग्याला बाशिंग बांधून तयार असले, तरी अशोक चव्हाण यांच्या गळ्यात विरोधीपक्ष नेतेपदाची माळ पडू शकते, असे कळते.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. अजित पवारांच्या सोबत सध्या ३५ हून अधिक आमदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवारांना या पदावरील आपला दावा सोडावा लागेल. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसने विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
(हेही वाचा Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांचा समावेश)
महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंकडे १५, राष्ट्रवादी १८ (अजित पवारांच्या बंडखोरीनंतर) आणि काँग्रेसकडे ४४ आमदारांचे बळ उरले आहे. त्यामुळे संख्याबळानुसार विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसला मिळणे क्रमप्राप्त असल्यामुळे काही नेत्यांनी गुढग्याला बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यात गटनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि नितीन राऊत यांचा समावेश आहे. परंतु, यातील एकालाही विरोधीपक्ष नेतेपद न देता अशोक चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी दिली जाणार असल्याचे कळते.
नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद वाचणार
विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी स्वपक्षातूनच नाराजीचा सूर उमटू लागल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे संकेत मिळत होते. त्यांच्या जागी अशोक चव्हाण यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र, राष्ट्रवादीमधील बंडखोरीमुळे विरोधीपक्ष नेतेपद रिक्त झाल्यामुळे चव्हाण यांना हे पद देऊन नाना पटोले यांना आणखी काहीकाळ प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवले जाणार असल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community