NCP : अर्धी राष्ट्रवादी देवेंद्रवासी; हिंदूंनी यातून काय अर्थ घ्यावा?

288

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावर भाष्य करताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देवेंद्रवासी असा शब्द उच्चारला. संजय राऊतांसारखी भाषा शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या तोंडी ऐकून अनेकांना धक्का बसला. त्यानंतर देवेंद्रवासी या शब्दावरुन राजकारणात गदारोळ माजला. अनेकांनी शरद पवारांवर टिका केली. मात्र दुसर्‍याच दिवशी देवेंद्रवासी या शब्दाचा खरा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी कृतीतून दाखवून दिला.

एकनाथ शिंदे यांच्या उठावाला एक वर्ष झालं आणि एका वर्षानंतर अजित दादांनी राष्ट्रवादी फोडली. जे काम एकनाथ शिंदे यांना करायला संघर्ष करावा लागला, ते काम अजित पवारांनी सहज केलं आणि तेही पवारांसारख्या बड्या नेत्याच्या विरोधात ते उभे राहिले. आता यात शंका घ्यायला जागा आहे. कारण अजित पवार दुसर्‍यांना सहज बाहेर पडले आहेत. असे आरोप होतात की पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीने झाला, पण पुढे पवारांनी फडणवीसांना साथ न देता महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरेंना युतीतून तोडण्यासाठी हा डाव पवारांनी टाकला असल्याचे म्हटले जाते. परंतु यामध्ये अजित दादांना प्यादा बनवलं गेलं.

आता अजित पवारांनी पुन्हा एकदा अचानक शपथ घेतली आहे, यावेळीचा शपथविधी सोहळा भर दुपारी झाला. ही दादांची प्रगतीच म्हणावी लागणार आहे. आता या घटनेतून दोन अर्थ निघतात.

पहिला अर्थ

सुब्रह्मण्यम स्वामी बर्‍याचदा नेहरुव्हियन या शब्दाचा उल्लेख करतात. पूर्वी दिल्लीत नेहरु संस्कृती चालायची, तशी महाराष्ट्रात पवार संस्कृती चालते. सत्ता कोणाचीही असो राजकीय वलय पवारांभोवती असतं अशी एक पद्धत होती. महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडवून आणायचा असेल तर हे वलय किंवा ही संस्कृती संपुष्टात आणली पाहिजे. शरद पवारांनी पहाटेचा शपथविधी अर्धवट मोडून, उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन आणि महाविकास आघाडी स्थापन करुन भाजपला दुखावलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्याच भाषेत त्यांना उत्तर देणं आवश्यक होतं.

अजित पवारांना ’शरद पवारांचा आशीर्वाद आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं आणि ’सर्वांचाच आशीर्वाद आहे’ असं म्हटलं. संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध केला आहे. शरद पवारांचे अनेक जवळचे नेते देखील अजितदादांसोबत आले आहेत. जर देवेंद्र फडणवीसांनी खरोखर राष्ट्रवादी फोडली असेल तर हा शरद पवारांना खूप मोठा धक्का आहे आणि म्हणूनच पवार नेहमी फडणवीसांना विरोध करायचे. पवारांना कदाचित त्यांचं प्रतिबिंब फडणवीसांमध्ये दिसत असावं. हा मुलगा आपल्याला मात देऊ शकतो अशी भिती त्यांना वाटत असणार. या घटनेचा एक अर्थ असा की फडणवीसांनी पवारांना चेक मेट केलं आहे.

(हेही वाचा Cabinet Expansion : आता फक्त १४ मंत्रीपदे शिल्लक; इच्छुकांची समजूत काढताना शिवसेनेसह भाजपाचीही होणार दमछाक)

दुसरा अर्थ

पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा होता आणि नंतर पवारांनी भाजपला फसवलं, असा आरोप केला जातो. हा आरोप खरा असेल तर या दुपारच्या शपथविधीला थेट पवारांची मूक संमती आहे, असा अर्थ काही जण काढत आहेत. उद्धव ठाकरे यांना आघाडीत घेण्यासाठी पहाटेचा शपथविधी गरजेचा होता. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचं ओझं खांद्यावरुन उतरवण्यासाठी दुपारचा शपथविधी आवश्यक आहे असा याचा अर्थ घेता येईल का? वर म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना जसा संघर्ष करावा लागला तसा संघर्ष अजित पवारांना करावा लागला नाही. दुसरी गोष्ट पवारांचे निकटवर्तीय अजितदादांना कसे येऊन मिळाले? इतका मोठा भूकंप घडत असताना पवार शांत कसे? काही दिवसांपूर्वी पवारांचं राजीनामा-नाट्य गाजलं होतं. त्यानंतर पक्षाची धुरा अजित पवारांकडे जाणार अशी शक्यता अजित पवारांना वाटत होती. मात्र शरद पवारांनी भाकरी फिरवली, इथे अजितदादा पूर्णपणे दुखावले गेले. जर अजित पवारांसोबत शरद पवारांनी न्याय केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती. मात्र महागठबंधनात सहभागी होताना आपलं बंधन तोडून आपलेच नेते निघून गेले. अशी अवस्था आज झाली आहे. त्यामुळे शरद पवारांनीच अजित पवारांना पाठवलं, याला फारसा अर्थ उरत नाही. शरद पवारांभोवती एक राजकीय वलय तयार झालं होतं, ज्यामुळे शरद पवार हे राजकारणातले सर्वेसर्वा आहेत असा समज झाला होता. तो आता हळूहळू दूर व्हायला लागणार आहे.

हिंदूंनी काय अर्थ घ्यावा?

अनेक हिंदूंना जे घडलं ते नक्कीच आवडलं नसणार. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकारण हे राजकारणासारखंच खेळावं लागतं. राष्ट्रवादीचे नेते सत्तेत सहभागी झाल्यामुळे संघ, भाजपीय आणि समर्थक नाराज झाले असतील. सत्ता मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी मनाला न पटणार्‍या गोष्टी कराव्या लागतात हे भाजपच्या समर्थकांनी समजून घेतलं पाहिजे. सरकार बहुमतात असताना राष्ट्रवादीच्या एक गटाला सत्तेत सहभागी करुन घेण्याची गरज काय असा प्रश्न निर्माणं होतो. तर याला प्रश्न असा की, जर अजित पवारांसोबत काही बड्या नेत्यांना जायचं असेल तर त्यांना काही तरी आमीष दिलं पाहिजे. अजित पवारांनी जरी स्वतःहून बंड केला असला तरी फडणवीसांनी त्यांना राजकीय आधार दिला आहे. अर्थात ही युती दीर्घकाळ टिकणार नाही. अजित पवारांचा मुख्य हेतू राष्ट्रवादी ताब्यात घेणे व भविष्यकाळात भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करणे असा आहे. फडणवीसांना २०२४ चा विधानसभेचा मार्ग मोकळा करायचा आहे. भाजपची निर्विवाद सत्ता स्थापन करायची आहे. मग त्या सत्तेत अनेक पक्ष येऊन मिळतील. मात्र पूर्ण बहुमताची सत्ता स्थापन करायची आहे, त्यासाठी ही राजकीय खेळी खूप महत्वाची आहे. विरोध पक्षांना दुबळं करुन निर्विवाद सत्ता स्थापन करता येईल. दुसरी गोष्ट महराष्ट्राचं भाजपविरोधी राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरत होतं, ते वलय मोडून काढणं गरजेचं होतं. हिंदूंनी अनुभवलं आहे की जर हिंदूविरोधी पक्ष सत्तेत आले की मोकळेपणाने बोलायची देखील चोरी होते. अतिशय वाईट पद्धतीने हिंदूविरोधी लोक सत्ता राबवतात. त्यामुळे विरोधकांमध्ये फूट पाडून, त्यांच्या मतभेदाचा लाभ उचलून पुढे जाणं श्रेयस्कर ठरतं. नरेंद्र मोदी निवृत्त होण्याच्या जवळ आले आहेत. तत्पुर्वी अनेक राज्ये भाजपला सुरक्षित करावी लागणार आहेत. महाराष्ट्र हे एक महत्वाचं राज्य आहे. ’दिल्लीचेही तत्ख राखितो’ असं आपण अभिमानाने म्हणतो. म्हणूनच महाराष्ट्र राज्य अत्यंत महत्वाचं आहे आणि दिल्लीत बसलेल्या नेत्यांचं महाराष्ट्रावर बारीक लक्ष आहे. आता श्रावण सुरु होणार आहे. महादेव हे आपले आराध्य आहेत. हरहर महादेव ही आपली युद्ध घोषणा आहे. भविष्यात अमृत मिळवण्यासाठी हलाहल प्राशन करण्याची आपली परंपरा आहे. अधिक काय सांगणे?

  • लेखक – जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.