Sunil Tatkare : सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

196
Sunil Tatkare : सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष
Sunil Tatkare : सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती ही हंगामी होती. ती रदद करून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुनिल तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून हा निर्णय मी घेतला असल्याची घोषणा प्रफुल पटेल यांनी केली. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. उलट जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनाच अपात्र करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र आम्ही विधानसभाध्यक्षांना दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शरद पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचेही अजित पवार म्हणाले. पक्ष आणि चिन्ह आमचेच आहे.

पक्षातील बहुसंख्य आमदार आमच्यासोबतच आहेत म्हणूनच अजित पवार इथे उपमुख्यमंत्री म्हणून बसला असल्याचेही अजित पवार यांनी ठणकावले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद रुपाली चाकणकर यांना, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी सूरज चव्हाण यांची तर पक्षाचे प्रतोद म्हणून अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही सुनिल तटकरे यांनी यावेळी जाहिर केले. शरद पवार हे आमचे गुरू आहेत. पक्षाला सत्तेत आणून, उपमुख्यमंत्रीपद मिळवून देउन त्यांना आम्ही गुरूदक्षिणा दिली आहे असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. आमच्याकडून कोणताही वाद नाही. उलट शरद पवार यांचा आशिर्वाद कायम रहावा अशीच आमची इच्छा असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांनी सहयाद्री अतिथीगृह येथे पत्रकारपरिषद घेऊन नवीन घोषणा केल्या. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांकडे केली आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ९ जणांना नोटीस काढण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे. आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी म्हणून अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे. त्याला काही अर्थ नाही. बहुसंख्य आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत. बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत म्हणून अजित पवार इथे उपमुख्यमंत्री म्हणून बसला आहे. पक्षाला विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची नियुक्ती करता येत नाही. तो अधिकार ज्या विरोधी पक्षाचे संख्याबळ जास्त आहे त्यांचा आणि नेमणूक करण्याचा अधिकार हा विधानसभाध्यक्षांचा असतो. उलट आम्हीच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याचे पत्र विधानसभाध्यक्षांना दिले असल्याचे अजित पवार म्हणाले.

शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारला असता, शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे विसरलात काय असा प्रतिप्रश्न करत अजित पवार म्हणाले, काल काहीची वक्तव्य आली की आम्ही जनतेत जाऊ, कायदेशीर कारवाई करणार नाही. पण रात्री काही वेगळ्या घटना घडल्या. त्याला काही एक अर्थ नाही. आमची भूमिका महाराष्ट्र आणि पक्षाच्या भल्याची आहे. कोणाची हकालपट्टी करण्यासाठी आम्ही पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरजेचे राजकारण करतोय. आम्ही म्हणजेच पक्ष आहोत. त्यानुसारच पुढे चाललोय. आमदार आमच्यासोबत आहेत. आमदारांच्या मतदारसंघातले प्रश्न असतील, कामांना स्थगिती दिली असेल तर त्या उठवून मतदारसंघाचा विकास करणे, जास्तीत जास्त निधी कसा देता येईल हे काम आम्ही करणार आहोत. कोणाला बंड वाटेल काय वाटेल. कोणाला काही वाटून चालत नाही. कायदा, अधिकार, नियम असतात. निवडणूक आयोगाचाच निर्णय अंतिम असतो असेही अजित पवार म्हणाले.

सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष

२१ जून २०२३ रोजी पक्षस्थापनादिवशी मला पक्षाचे कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आल्याचे सांगून प्रफुल पटेल म्हणाले, त्यानुसारच मी जबाबदारी पार पाडत आहे. त्याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. पहिल्यांदाच मला उपाध्यक्ष हे नवीन पद देण्यात आले होते. त्याअंतर्गत मी संघटनात्मक नियुक्त्या केल्या होत्या. पक्षाच्या निवडणुका ३ वर्षांनी झाल्या पाहिजेत असे घटनेत आहे. निवडणुका न झाल्याने आधीचे पदाधिकारी यांना हंगामी चार्ज दिला होता. महाराष्ट्राची जबाबदारी जयंत पाटील यांना दिली होती. आजपर्यंत त्यांना ती जबाबदारी पार पाडण्याची संधी दिली. पण राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने मी आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद सुनिल तटकरे यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे आता सुनिल तटकरे पक्षाच्या पुढील नियुक्त्या करू शकतील. विधानसभाध्यक्षांना काल सूचित केले की महाराष्ट्र विधानसभेतील जो विधिमंडळ पक्ष आहे त्याचे नेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. कारण ही नियुक्ती पक्ष करतो. त्याचसोबत आम्ही अनिल भाईदास पाटील यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले.

रुपाली चाकणकर महिला प्रदेशाध्यक्षपदी

रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तर सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील अशी घोषणा सुनिल तटकरे यांनी केली. ५ तारखेला आम्ही एमईटी कॉलेजमध्ये राज्यभरातील तालुका, जिल्हा, प्रदेश प्रतिनिधी यांची बैठक ठेवली आहे. राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहतील असेही सुनिल तटकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.