एनआयएने केला ‘इसिस’च्या महाराष्ट्र मॉड्युलचा पर्दाफाश

246
एनआयएने केला 'इसिस'च्या महाराष्ट्र मॉड्युलचा पर्दाफाश

संतोष वाघ 

भारतात दहशतवादी कारवाया करत मोठा नरसंहार घडवून आणण्याचा कट रचण्यासाठी महाराष्ट्रात स्लीपर सेलची स्थापना करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ‘इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया’ (इसिस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा कट एनआयएने उधळून टाकत महाराष्ट्रातून या संघटनेच्या बांधणीसाठी काम करणाऱ्या चार जणांना सोमवारी (३ जुलै) सकाळी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या या चौघांनी ‘इसिस’ मध्ये अनेक तरुणांची भरती करून त्यांना बॉम्ब बनवणे, शस्त्र चालवणे,शस्त्र तयार करणे याचे प्रशिक्षण दिल्याची धक्कादायक बाब एनआयएच्या तपासात समोर आली आहे. ताबीश नासेर सिद्दीकी, जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा, शरजिल शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. ताबिश याला मुंबईतील नागपाडा, जुबेर याला कोंढवा पुणे आणि शरजिल आणि झुल्फिकार यांना ठाणे जिल्ह्यातील पडघा येथून अटक करण्यात आली आहे. एनआयएने या चौघांना अटक करून इसिसचे महाराष्ट्रातील एक मॉड्युल उध्वस्त केले आहे.

(हेही वाचा – खलिस्तानींनी लावली अमेरिकेतील भारतीय दूतावासाला आग)

जून २८, २०२३ रोजी एनआयएने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरांची आणि इतर पाच ठिकाणांची एनआयएकडून झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान आरोपीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली. अटक करण्यात आलेल्या आरोपी यांनी महाराष्ट्रातून इसिसला मजबूत आणि सक्रिय करण्यासाठी तसेच दहशतवादी संघटनेचा भारताविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी व असुरक्षित तरुणांना प्रवृत्त करण्यासाठी या सामानाचा (साहित्याचा) वापर केल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

एनआयएच्या प्राथमिक तपासात अशीही माहिती समोर आली की, आरोपींनी इस्लामिक स्टेट (आयएस), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल), इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि यासारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या इसिसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता. शिवाय, त्यांच्या परदेशस्थित इसिस हँडलर्सच्या संगण्यावरून आरोपींनी बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी इसिसच्या ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक लेख लिहले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.