देशमुखांची विकेट पडणार, दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री होणार?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा जोरदार दबाव वाढत असल्याने एनसीपीने आता देशमुखांची गृहमंत्री पदावरून उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.   

178

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी, २१ मार्च रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलतांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत, त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत सोमवार, २२ मार्चपर्यंत देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा का, यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगत देशमुख यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. संध्याकाळपर्यंत शरद पवार यांच्या निवासस्थानी एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु असून गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्याजागी एनसीपीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्री पद देण्याच्या निर्णयावर एकमत होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

एनसीपीवर देशमुखांच्या राजीनाम्यासाठी दबाव!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारला बॅकफुटवर जावे लागले असताना आता गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचा भर शरद पवार यांचा आहे. मात्र यावेळी गृहखाते अत्यंत अभ्यासू आणि शरद पवार यांच्या मर्जीतील व्यक्तीकडे देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असून, दिल्लीत जोरदार चर्चा सुरू आहे.

(हेही वाचा : उद्यापर्यंत देशमुखांवर निर्णय घेऊ! – शरद पवार )

वळसे-पाटील शांत, संयमी! 

गृहमंत्रीपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असून, दिल्लीत सध्या यासाठी बैठक सुरू आहे. दिलीप वळसे-पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बचावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे-पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे-पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एनसीपीच्या नेत्यांची सारवासारव!

दरम्यान राज्यात एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणात एटीएस आणि एनआयए चौकशी करत आहेत. एटीएसने रविवारी, २१ मार्च रोजी २ जणांना अटक केली असून एटीएस दोषींच्या जवळ पोहचली आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, असे सांगत जरी सारवासारव करत असेल तरी कोणत्याही विषयावर थेट प्रतिक्रिया देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यावर बोलण्यास टाळले आणि देशमुखांच्या राजीनाम्यावर सूचक इशारा दिला.

(हेही वाचा : गृहमंत्रालय कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? – देवेंद्र फडणवीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.