BEST Bus : बेस्ट बसचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरतोय जीवघेणा

347
BEST Bus : बेस्ट बसचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरतोय जीवघेणा
BEST Bus : बेस्ट बसचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरतोय जीवघेणा

मुंबईकरांकडून प्रवास करण्यासाठी सर्वात सुरक्षित वाहतूक म्हणून एकेकाळी ‘बेस्ट’ला प्राधान्य दिले जात होते. मात्र हीच ‘बेस्ट’ मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरत आहे. ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या ‘बेस्ट’ च्या कंत्राटी बस चालकांनी मात्र ‘आजचा दिवस अपघाताचा’ असे बोलण्याची वेळ ‘बेस्ट’ प्रशासनावर आणून ठेवली आहे. मुंबईतील वाढत्या बेस्ट बसेसच्या अपघातामुळे मुंबईकरांना रस्त्यावरून चालताना तसेच बसमधून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

मुंबईत होणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातात एका वर्षात जवळपास १० जणांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी होती. परंतु मागील काही वर्षांत मुंबईत बेस्ट बस अपघाताची आणि मृत आणि जखमींच्या संख्येत वाढ झाली आहे. जून या एका महिन्यात मुंबईत झालेल्या बेस्ट बस अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बस चालकांच्या चुकीमुळे अपघाताची आणि मृतांची संख्या वाढत असल्याची बोलले जात आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथे झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे.

मुंबईच्या ‘बेस्ट’ला एकेकाळी जगातील सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मानले जायचे, परंतु गेल्या काही वर्षांत बेस्टची सेवाच खराब झाली नाही तर आता त्याच्या सुरक्षिततेच्या ट्रॅक रेकॉर्डवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बेस्ट बसेसच्या वाढत्या जीवघेण्या अपघातांच्या मालिकांवरून चालकांची बेपर्वाई आणि यांच्यावर नसणारे अनुशासन हे कारण समोर येत आहे. बेस्टच्या बहुतांश बसेस कंत्राट पद्धतीने चालविण्यात येत असून या बसेस वर असणारे चालक देखील कंत्राटी कामगार आहे. कंत्राट पद्धतीने घेतलेले बस चालक हे पूर्वी ट्रक, टेम्पो, टॅक्सी, आणि खाजगी वाहन चालक असून त्यांना बेस्टकडून कुठलेही प्रशिक्षण दिले जात नसल्यामुळे हे चालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची शक्यता एका सेवानिवृत्त बेस्ट बस चालकाने वर्तवली.

या माजी बेस्ट चालकाच्या म्हणण्यानुसार पूर्वी एअर इंडिया, लार्शन अँड ट्युब्रो, इंडियन एअरलाईन्स या सारख्या अनेक कंपन्यांच्या बसेस कर्मचाऱ्याना ने-आण करण्यासाठी मुंबईत धावत होत्या. या कंपन्यांकडून त्यांच्या बसेस वरील चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी बेस्टच्या प्रशिक्षण शिबिरात नियमित पाठवले जात होते. परंतु सध्या बेस्टच्या कंत्राटी चालकांना कुठलेही प्रशिक्षण दिले जात नसल्यामुळे मुंबईत बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिका सुरू असल्याची खंत सेवानिवृत्त बेस्ट चालक व्यक्त करीत आहे. कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या बेस्ट बस चालकाकडून नियमितपणे वाहतुकीचे उल्लंघन केले जात आहे. सिग्नल जम्प करणे, लेन कटिंग, अनेक वेळा वाहतूक कोंडीला कंत्राटी बेस्ट चालक जबाबदार असतात असे मुंबई वाहतुक विभागाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.