पक्षावरील दावा सिद्ध करण्यासाठी अजित पवारांना करावा लागणार संघर्ष; शरद पवारांनी आधीच…

शिंदे प्रकरणापासून आधीच घेतला होता धडा.

232
पक्षावरील दावा सिद्ध करण्यासाठी अजित पवारांना करावा लागणार संघर्ष; शरद पवारांनी आधीच...

वंदना बर्वे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीच्या घटनेपासून धडा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आधीच आपली बाजू भक्कम करून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्ष ताब्यात घेण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकवित एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. एवढेच नव्हे तर, शिंदे यांच्याप्रमाणे आपलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा असल्याचा दावा केला आहे.

मात्र, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील पक्षच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. यामुळे, अजित पवार यांनी पक्षावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि तसा दावा केला असला तरी कायद्याच्या माध्यमातून ही बाब त्यांना सिध्द करता येणार नाही. यामुळे, अजित पवार यांना तारेवरची अवघड कसरत करावी लागणार आहे.

(हेही वाचा – सलग दुसऱ्या दिवशी अंबानी कुटुंबाची ईडी चौकशी; टीना अंबानी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल)

श्रीवास्तव यांनी सांगितले की, देशभरातील तमाम विरोधी पक्षांची वज्रमूठ दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली आहे. विरोधी ऐक्याची ताकद कमी झाली नाही तर २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही, हेही मोदी यांना कळून चुकले आहे. म्हणूनच भाजप विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आली तशी वेळ आपल्यावरही येवू शकते याचा अंदाज बांधून शरद पवार यांनी आधीच सर्व बंदोबस्त करून ठेवला आहे. २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात शरद पवार यांची पक्षाध्यक्षपदी पुढील तीन वर्षांसाठी एकमताने निवड करण्यात आली होती.

याच दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करीत सरकार स्थापन केले आणि शिवसेनेवर हक्क दाखविला. निवडणूक आयोगापुढे या प्रकरणाची बरेचदा सुनावणी झाली. तेव्हा ठाकरे यांनी आयोगाकडे जसे दस्तावेज सादर करायला हवे होते तसे केले नाही ही बाब राष्ट्रीय काँग्रेसच्या लक्षात आली होती. या सर्व गोष्टींपासून धडा घेत राष्ट्रीय काँग्रेसने सर्व प्रकारच्या उणीवांची पुर्तता आयोगाकडे केलेली आहे. यामुळे, अजित पवार यांनी मूळ पक्षावर दावा केला असला तरी निवडणूक आयोगापुढे ही बाब त्यांना सिध्द करता येणार नाही, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

दुसरीकडे, शरद पवार यांनी केंद्रीय कार्यालयाची सर्व जबाबदारी सोनिया दुहन यांच्याकडे सोपविली आहे. दुहन या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या खास म्हणून ओळखल्या जातात, हे येथे उल्लेखनीय. दुहन यांनी सुध्दा निवडणूक आयोगाला पत्र लिहून शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय काँग्रेस हाच खरा पक्ष असल्याचे म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.