मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयांवर झालेल्या वादानंतर शिवसेनेसह सर्व पक्षांची कार्यालयांना महापालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या निर्देशानुसार डिसेंबर महिन्यात सिल ठोकण्यात आले आहे. नवीन महापालिका अस्तित्वात येईपर्यंत ही कार्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोविड काळात ही कार्यलये बंद ठेवल्याने त्याठिकाणी वाळवी लागण्याचा प्रकार घडला होता, परंतु आता पुन्हा ही कार्यालये बंद ठेवल्याने यातील फर्निचरसह इतर कागद पत्रांना वाळवी लागल्याची भीती आता खुद्द अधिकारी कर्मचारी यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे आता ही कार्यालये खुली करुन त्याची साफसफाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ही कार्यालये सुरू व्हावीत यासाठी भाजप कडून प्रयत्न सुरू असून जर ही कार्यलये वाद नसलेल्या पक्षांना खुली करून दिल्यास या कार्यालयांची देखभाल राखली जाईल आणि कार्यालय बंद ठेवल्याने होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल, असेही बोलले जात आहे.
(हेही वाचा – चेंबूर चुनाभट्टी मधील रस्ता खचल्यामुळे ४० ते ५० वाहने खड्यात कोसळली)
महापालिका मुख्यालयांमधील जुन्या हेरिटेज इमारतीच्या तळ मजल्यावर शिवसेना, भाजप, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांची पक्ष कार्यालये आहेत. महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्य संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाला कार्यालये वितरीत करण्यात आली आहे. परंतु या निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. महापालिका बरखास्त झाल्यानंतरही आजीचे माजी झालेल्या नगरसेवकांसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मेहेरबानी खातर ही कार्यालये नगरसेवकांसाठी खुली ठेवली होती. परंतु शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि शिंदे गटाचे नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाली.त्यानंतर शिवसेना पक्ष कार्यालय बंद करण्यात आले. त्यासोबतच भाजप, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यालयांनाही सिल ठोकण्यात आले.
ही कार्यालये बंद केल्यानंतर भाजपच्या शिष्ट मंडळाने आयुक्त तथा प्रशासक चहल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतरही आयुक्तांनी कार्यालय उघडून देण्यास असमर्थता दर्शवली होती. मात्र, त्यावेळीच हिंदुस्थान पोस्टने, ‘…तर महापालिकेतील पक्ष कार्यालयांना वाळवी?’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी, जर ही कार्यालये बंद राहिल्यास याला वाळवी लागण्याची भीती वर्तवली जात आहे. ही सर्व पक्ष कार्यालये जुन्या हेरिटेज इमारतीत असल्याने याठिकाणी वाळवी लागण्याचे प्रकार घडत असतात. या सर्व जागांचे नुतनीकरण करत या जागी पक्ष कार्यालये बनवण्यात आली आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. कोविड काळात अशाचप्रकारे ही कार्यालये बंद ठेवलेली असताना याठिकाणी वाळवी लागण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी ही वाळवी काढून साफसफाई करून घेतली होती. त्यामुळे आता जर दिर्घकाळ ही कार्यालये सुरु राहिल्यास त्याला वाळवी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जावू शकतो, अशी भीती व्यक्त केली होती.
मात्र आता सहा महिन्यांनंतर या सर्व कार्यालयांमध्ये वाळवी लागण्याची शक्यता आता देखभाल करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे या कार्यालयांच्या साफसफाईची मोहीम न राबवल्यास ही वाळवी इतर लकडांसह साहित्याला लागेल आणि पर्यायाने हेरिटेज वास्तू असलेल्या इमारतीत ही वाळवी पसरेल असे बोलले जात आहे. या जुन्या हेरिटेज इमारतीच्या बांधकामात लाकडांचा अधिक वापर झाल्याने ही वाळवी पसरण्याचीशक्यता जास्त आहे. या कार्यालयांचे नूतनीकरण केल्यानंतर बरेच महिने ही कार्यालये बंद होती, त्यानंतर कोविड काळात बंद राहिली आणि आता महापालिका संपुष्टात आल्याने नगरसेवक निवडी अभावी बंद राहिली, त्यामुळे ही वास्तूच पक्ष कार्यालय करता अशुभ असल्याचेही बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community