आपलं नाणं खोटं आहे, याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला. पण मी एक सांगू इच्छितो की, आपले चिन्ह जाणार नाही आणि मी ते जाऊ देणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
मुंबईतील यशवंतराव सेंटरमध्ये बुधवारी दुपारी १ वाजता शरद पवार गटाची बैठक पार पडली. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, “आज काही जण भाषणात सांगून गेले की, शरद पवार आमचे गुरु आहेत. आमच्या मित्रांचा मेळावा झाला त्यात फोटो पाहिले का? सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत पोस्टर लावली की फोटो माझा. त्यांना माहित आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे चालणारं नाणं घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं खरं नाही, ते खणकन वाजणार नाही. अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे जाऊ देत नाहीत असाही आरोप झाला. कसले बडवे? पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असेल तर कुणी अडवत नाही. पांडुरंग म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं. ही गंमतीची गोष्ट आहे”, असे पवार यांनी सांगितले.
एक तर आपले सहकारी आहेत, ते म्हणाले हे काही चाललं आहे ते बरोबर नाही. मी काय चाललंय ते बघून येतो आणि तुम्हाला कळवतो. त्यानंतर मला त्यांनी शपथ घेतल्याचाच फोन केला, असा टोला पवार यांनी छगन भुजबळांना लगावला. काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी तक्रार नाही, पण दुःख आहे. कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. कार्यकर्त्यांनी अपार मेहनत केली होती. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्याच विचारांच्या पंक्तीला जाऊन बसणं योग्य नाही. उद्या कुणीही उठलं आणि मी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे असं सांगितलं, तर याला काही अर्थ आहे? ही गोष्ट लोकशाहीत योग्य आहे का?, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा – पाकिस्तानी तरुणीचे भारतात येणे संशयास्पद; देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?)
मोदींवर टीका
देशाच्या पंतप्रधानांनी आठ दिवसांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्य सहकारी बँक आणि पाटबंधारे खात्याचा उल्लेख केला. एकदा पंतप्रधान बारामतीत आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं देश कसा चालवायचा, हे पवारांचं बोट धरून मी शिकलो. निवडणुकीच्या काळात आले तेव्हा प्रचंड टीका केली. जे देशाचं नेतृत्व करतात, त्यांनी बोलत असताना विशिष्ट काळजी घ्यावी लागते. जे सत्य आहे तेच सांगितलं पाहिजे. पण तेवढी धमक पंतप्रधानांनी दाखवली नाही. आपण देशाचे नेता म्हणून जनमानसासमोर बोलतो त्यावेळी मर्यादा पाळली पाहिजे. त्या मर्यादा पाळल्या जात नाहीत, अशी टीका पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community