देशात असो किंवा विदेशात आपण सर्वात आधी भारतीय आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. माता, मातृभाषा आणि मातृभूमी सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे कुटुंब आणि समाजात वावरताना जास्तीत जास्त प्रमाणात मातृभाषेचा उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील कोरडा इथल्या भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राचे बुधवारी (५ जुलै) मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाल्या की, वर्तमानातील तरुण पिढी शिक्षणासाठी देश विदेशात जाताना दिसते. पालकांनी त्यांना मातृभाषेचे देखील शिक्षण दिले पाहिजे. ती ही आपली ओळख आहे आणि जगात कुठेही असले तरी मातृभूमीला कधीच विसरू नये अशी शिकवण पालकांनी दिली पाहिजे. तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामाची महती सांगणे देखील आवश्यक आहे. त्यांना हुतात्म्यांच्या बलिदानाबाबत माहिती दिली पाहिजे असे देखील राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.
(हेही वाचा – महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी – मंत्री रविंद्र चव्हाण)
यावेळी त्यांनी भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या माळ्यावरील दालनात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या माळ्यावरील दालनात १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सचित्र मांडण्यात आली आहे. १४ हजार ७६० चौरस फुटांचे प्रत्येक मजल्यावर दालन आहे. दक्षिण भारतीय शैलीत हे केंद्र तयार करण्यात आले आहे. परमवीर चक्र प्राप्त २१ जवानांची माहितीही या दालनात देण्यात आली आहे. दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रामायण दर्शन दालन असून यात महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून, रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. प्रभू श्रीरामाचा संपूर्ण जीवनप्रवास या दालनात रेखाटण्यात आला आहे.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भारत माता दालन असून यात भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र गॅलरी तयार करण्यात आली आहे. जवळपास २० मिनिटे राष्ट्रपती या दालनात उपस्थित होत्या. राजेंद्र पुरोहित यांच्याकडून त्यांनी दालनाची माहिती घेतली. कोराडी मंदिर परिसरात येणा-या भाविकांसाठी आजपासून हे दालन खुले झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या दालनामुळे मंदिर परिसराचे पर्यटन महत्व वाढले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community