मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींचा निधी; जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

272
मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींचा निधी; जिल्हा नियोजन समितीची मंजुरी
मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींचा निधी; जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

मुंबई शहर जिल्हा विकासासाठी ३६५ कोटींच्या निधीला बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित, असे निर्देश शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिले.

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या वेळी पालकमंत्री केसरकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अजय चौधरी, आमदार अमीन पटेल, आमदार सदा सरवणकर, आमदार सचिन अहीर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार ॲड. मनीषा कायंदे, आमदार यामिनी जाधव, आमदार सुनील शिंदे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुपेकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी केसरकर म्हणाले की, मुंबई शहरातील ‘म्हाडा’ आणि इतर वसाहतींच्या इमारतींमध्ये वास्तव्यास असणारा मूळ मुंबईकर कुठल्याही परिस्थितीत मुंबईच्या बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेत मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित. तसेच मुंबई शहरात अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावित. ज्या भागात अवैध व्यवसाय आढळून येतील त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मुंबई शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसोबत करार करण्यात आला असून त्यांचीही मदत घेण्यात येत आहे.

मुंबई शहरातील त्या- त्या भागातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी केंद्र (फूड कोर्ट) तसेच फूड ऑन व्ह‍िल कार्यान्वित करावे. या केंद्रांसाठी जागा निश्चित करावी. घनकचरा व्यवस्थापन, बाजारपेठांचे अद्ययावतीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक केंद्र सुरू करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने आराखडा तयार करावा. या कामाला प्राधान्य देऊन अभियानस्तरावर काम पूर्ण करावे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ‘रिड महाराष्ट्र’ योजना प्राधान्याने राबविण्यात यावी व यासाठीचा प्रस्ताव बृहन्मुंबई महापालिकेने तातडीने सादर करावा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्यात.

(हेही वाचा – Tomato : पेट्रोलपेक्षाही टॉमेटो महाग; मुंबईत इतर भाज्यांचे काय आहेत नवे दर?)

कुठे किती निधी?

मंजूर झालेल्या निधीपैकी नागरी दलित वस्त्यांमध्ये सुधारणांसाठी १३२ कोटी रुपये, पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता ३० कोटी, पोलिस वसाहतीत पायाभूत सोयीसुविधांसाठी ३० कोटी, शासकीय कार्यालयीन इमारतींची देखभाल, दुरुस्ती व सोयीसुविधांसाठी २७ कोटी, झोपडपट्टी वासीयांचे स्थलांतर व पुनर्वसनासाठी २६.९० कोटी, शासकीय महाविद्यालयांच्या विकासासाठी १५ कोटी, नावीन्यपूर्ण योजनांसाठी १२ कोटी, रुग्णालयांसाठी औषधे, साहित्य व साधनसामग्रीच्या खरेदीसाठी १० कोटी, गड, किल्ले, मंदिर व महत्त्वाच्या संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी ८ कोटी रुपये, रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी २० कोटी, रुग्णालयातील यंत्रसामग्रीसाठी १८ कोटी, लहान मच्छिमार बंदरांच्या विकासासाठी १० कोटी, महिला सबलीकरण व बालकांच्या विकासासाठी ५ कोटी ६५ लाख रुपये, व्यायाम शाळांच्या विकासासाठी ३ कोटी रुपये, यांसह विविध विकासकामांच्या प्रस्तावांना पालकमंत्री केसरकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.