मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिट कामांसाठी महामार्ग बनवणाऱ्या कंपन्यांची नेमणूक करण्यात आल्याने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे थयथयाट करत असले तरी प्रत्यक्षात यापूर्वी हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या कामांसाठी नेमणूक करण्यात आलेल्या प्रस्थापित कंत्राटदाराकडून आता निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ आता हरिश्चंद्र माणिक पाटील मार्गांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांचेही काम निकृष्ट बनले आहे. या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून लोकांसाठी खुले करण्यात आले होते. परंतु या रस्त्यांवरच अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या पहायला मिळत आहे.
दादर पश्चिम येथील रानडे मार्गाला जोडून जाणाऱ्या सेनापती बापट पुतळ्याशेजारील हरिश्चंद्र पाटील मार्गांच्या सिमेंट काँक्रिटचे काम महापालिकेने हाती घेतले. रस्त्यांच्या निम्म्या भागाचे अर्थात एमटीएनएलपर्यंतचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम पावसाळा सुरु झाल्याने वापरण्यास सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची असते. परंतु या कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदाराने सिमेंटीकरण केलेल्या रस्त्याच्या भागांवर अनेक ठिकाणी चिरा तथा भेगा पडलेल्या पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मॅनहोल्सच्या परिसराचे बांधकाम खचलेले पाहिल्याने स्थानिक रहिवाशांनी संबंधित कंत्राटदाराच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी हे बांधकाम तोडून नव्याने बनवूनही दिले. परंतु या व्यतिरिक्तही अनेक भागांवर या रस्त्यांच्या पृष्ठभागावर भेगा पडलेल्या पहायला मिळत असल्याने या रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे बनल्याचे स्पष्ट होत आहे.
सेनापती बापट चौकाच्या विरुध्द बाजुलाच समर्थ व्यायाम मंदिर मार्ग असून हा मार्ग केळुस्कर रोड, एम.बी. राऊन मार्ग दक्षिण यांना छेदून चौकाला जोडला गेला आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण मागील वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु रस्त्यांचे सिमेंटीकरण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यांतच या रस्त्यावर भेगा पडल्या होत्या. त्याबाबत हिंदुस्थान पोस्टने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर कंत्राटदाराच्या माध्यमातून पुन्हा काम करण्यात आले होते. परंतु या वर्षी या रस्त्यावरील भेगा मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. विशेष म्हणजे केळुस्कर मार्गाचे सिमेंटीकरण ३० वर्षांपूर्वी झाले होते. त्यावर आता काही प्रमाणात भेगा पडल्याचे पहायला मिळत आहे. परंतु याला जोडलेल्या समर्थ व्यायाम मार्गावर वर्षभरातच मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने हा रस्ता किती वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला असा सवाल स्थानिक रहिवासी करताना दिसत आहे.
त्यामुळे आधी समर्थ व्यायाम मंदिर मार्ग आणि त्यानंतर हरिश्चंद्र पाटील मार्गाच्या सिमेंट काँक्रिटच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे प्रस्तापित कंत्राटदारांच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशाप्रकारची निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याने अजोय मेहता महापालिका आयुक्त असताना त्यांनी मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातूनच रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु आता ६०८० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये महामार्गांचे तसेच विमानतळाचे काम करणाऱ्या कंपन्यांना देण्याचा प्रयत्न झाल्याने आता प्रशासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community