पाकिस्तान, बांग्लादेश आणि अतिरेकी कैद्यांना वगळता राज्यातील विविध तुरुंगात शिक्षा भोगत असणारे तसेच न्यायप्रतीक्षेत असणाऱ्या विदेशी कैद्यांना व्हिडिओ कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या कैद्यांना दोन आठवड्यातून एकदा व्हिडिओ कॉलवर कुटुंब आणि वकीलासोबत १५ मिनिटे बोलता येणार असल्याची माहिती राज्य कारागृह महासंचालक अभिताभ गुप्ता यांनी दिली.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तुरुंगात वेगवेगळ्या गुन्ह्यात ६३७ कैदी आहेत, त्यापैकी ११४ महिला कैदी असून ६३७ कैद्यांपैकी ३२ कैद्यांना शिक्षा झालेली आहे, आणि उर्वरित कैदी न्याय प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई-प्रिजन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
भारतीय कैद्यांना ही सुविधा देण्यात आली होती, परंतु ही सुविधा विदेशी कैद्यांना देण्यात येत नव्हती. विदेशी कैद्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून सदरची सुविधा पुरवून मानवी हक्कांचे संरक्षण करणे गरजेचे आहे असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढून कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी ४ जुलै २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सदरील सुविधा पाकिस्तानी, बांग्लादेशी व अतेरिकी कारवायातील कैदी वगळता इतर विदेशी कैद्यांना देण्यात यावी असे निर्देश राज्यातील सर्व तुरुंग अधिकारी यांना दिले आहे. या सुविधेत दोन आठवड्यातून एकदा व्हिडीओ कॉलचा वेळ १५ मिनिटांचा ठेवण्यात यावा असे ही निर्देशात म्हटले आहे. ६३७ परदेशी कैद्यांपैकी विशेषतः मुंबई, नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी कैद्यांचे प्रमाण अधिक आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar : ‘या’ कारणामुळे शरद पवारांचा धुळे, जळगाव जिल्ह्यांचा दौरा रद्द)
नायजेरियन, बांग्लादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ इत्यादी देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन विविध तुरुंगात आहेत. विदेशी कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यासाठी येऊ शकत नसल्याने विदेशी कैद्यांना कायदेशीर मदत मिळण्यास व कारागृहातून सूटका होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विदेशी कैद्यांमध्ये नैराश्य वाढू लागते त्यामुळे कारागृह प्रशासनाला सदर कैद्यांवर सतत निगराणी ठेवावी लागते. सदरची सुविधा विदेशी कैद्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल व कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची गर्दी थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असे कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community