मागील काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी अगदी वेगाने घडत आहेत. अशातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून राज्यातील राजकारणाने एक नवे वळण घेतले आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आपल्या कामाचा वेग वाढवत शिवसेनेसह ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी सर्व आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. राहुल नार्वेकर लवकरच या प्रकरणाबाबत निर्णय घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गटाने शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र या १६ आमदारांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला. तसेच त्यांना ९० दिवसांमध्ये याचा अंतिम निर्णय देण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार आता राहुल नार्वेकर यांनी सर्व आमदारांना नोटीस पाठवून त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे.
(हेही वाचा – Shivsena : एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे सरदार!)
राहुल नार्वेकर काय म्हणाले होते?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरु होणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी म्हणजेच ७ जुलै रोजी सांगितलं होतं. राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती. मागच्या आठवड्यात ही प्रत त्यांच्या हाती लागली. आता आम्ही सुनावणी सुरु करु, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरु होणार असं विचारलं असता नार्वेकर यांनी ‘लवकरच’ असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे आता लवकरच आमदारांच्या अपात्रतेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community