विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अंबादास दानवेंचे विरोधीपक्ष नेतेपद धोक्यात आले आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाची विधानपरिषदेतील सदस्य संख्या समान झाल्याने काँग्रेसमधील काही आमदारांनी विरोधीपक्ष नेतेपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेत ठाकरे गटाचे ११ आमदार होते. त्यापैकी विप्लव बाजोरिया आणि मनीषा कायंदे यांनी शिवसेनेला समर्थन दिल्यामुळे ही संख्या ९ वर आली. परिणामी राष्ट्रवादीची सदस्य संख्या ठाकरे गटाइतकी झाल्याने त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदावर दावा सांगण्याची तयारी सुरू केली होती. विशेषतः एकनाथ खडसे या पदासाठी आग्रही होते.
मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ४० आमदारांसह शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक समीकरणे बदलली. आजमितीला विधानपरिषदेतील ६ आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने सुटकेचा निश्वास सोडला असताना, नीलम गोऱ्हे यांनी त्यांना सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे ठाकरे गटाची सदस्य संख्या ८ इतकी झाली आहे. ही बाब ध्यानात घेऊन काँग्रेसमधील काही आमदारांनी विरोधीपक्ष नेतेपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. कोल्हापूरचे सतेज पाटील या पदासाठी विशेष आग्रही आहेत. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी तसा आग्रह धरला आहे. त्यामुळे येत्या काळात विरोधीपक्ष नेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
(हेही वाचा – गडचिरोलीचा विकास व्हावा व नक्षलवाद संपावा, हेच शासनाचे धोरण – उपमुख्यमंत्री अजित पवार)
कोणाचे किती संख्याबळ?
भाजपा – २२
शिवसेना – ११ (ठाकरे गट ८, शिंदे – ३)
राष्ट्रवादी – ९ (अजित पवार – ६, शरद पवार -३)
काँग्रेस – ८
हेही पहा –
Join Our WhatsApp Community